काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे तीन वादग्रस्त कृषी कायद्यांवरून केंद्र सरकारवर हल्ला चढविला. शेतकऱ्यांचा विनाश करण्याचे सरकारचे कारस्थान असून आपला पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील, असेही ते म्हणाले.

भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार दोन-तीन मित्रांचे भले करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोपही या वेळी गांधी यांनी केला. सरकार शेतकऱ्यांकडे केवळ दुर्लक्षच करीत नसून सरकार त्यांचा विनाश करण्याचे कारस्थान रचत आहे, असेही त्यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.

आपल्या दोन-तीन मित्रांच्या भल्यासाठी सरकार शेतकऱ्यांचा विनाश करीत आहे. शेतकऱ्यांच्या मालकीचे जे आहे ते सरकार आपल्या मित्रांना देण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांकडून जमिनी, पीक हिसकावून ते मित्रांना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

जल्लीकट्टूचा अनुभव

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी अवनीपुरम येथे जल्लीकट्टू या क्रीडाप्रकाराचा प्रत्यक्ष आनंद लुटला आणि यामधून तमिळ संस्कृती आणि इतिहासाचे दर्शन होत असल्याचे ते म्हणाले. या वेळी द्रमुकचे युवा नेते उदयनिधी स्टालिन हे व्यासपीठावर हजर होते.

हा अत्यंत लोकप्रिय क्रीडाप्रकार पाहण्यासाठी आपण दिल्लीहून येथे आलो आहोत. कारण तमिळ संस्कृती, भाषा आणि इतिहास देशाच्या भवितव्यासाठी आवश्यक आहे आणि त्यांचा प्रत्येकाने आदर ठेवला पाहिजे. तमिळ भाषा आणि संस्कृती यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना संदेश देण्यासाठी आपण येथे आलो आहोत, असेही राहुल गांधी कोणाचाही नामोल्लेख न करता म्हणाले.

गांधी यांच्यासमवेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाळ, तमिळनाडू काँग्रेस प्रदेशाध्यक्ष के. एस. अळगिरी आणि पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी  होते. तमिळनाडूची संस्कृती, भाषा आणि इतिहास यांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे, असे गांधी म्हणाले.