दिल्लीतील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) इमारतीला शनिवारी पहाटे लागलेल्या आगीत दलाचा एक कर्मचारी होरपळून मरण पावला, तर कार्यालयातील सामान आणि अन्य दस्तऐवजांचे नुकसान झाले.
येथील आरकेपुरम परिसरात असलेल्या सीआरपीएफ कार्यालयाच्या इमारतीमधील चौथ्या मजल्यावर पहाटे तीन वाजण्याच्या सुमाराला आग लागली. या मजल्यावर इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग केंद्र आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे सात बंब घटनास्थळी रवाना झाले. सकाळपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. आग लागली त्या वेळी या इमारतीमध्ये झोपलेला सीआरपीएफचा हेड कॉन्स्टेबल होरपळून मरण पावला. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला, मात्र गाढ झोपेत असल्याने तो मरण पावला, असे अधिकाऱ्याने सांगितले.
या आगीत संपूर्ण चौथ्या मजल्याला आग लागली, त्यामध्ये अनेक दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झाली. सीआरपीएफ कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य भत्ते यासंबंधीच्या नोंदी या कार्यालयात होत्या.