मुस्लिमांमधील तिहेरी तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नित्व या प्रथांशी संबंधित याचिकांची सुनावणी करून त्यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालय पाच सदस्यांचे एक घटनापीठ नेमणार आहे.

या याचिकांच्या अनुषंगाने संबंधित पक्षांनी मांडलेल्या मुद्दय़ांचे तीन संच रेकॉर्डवर घेतानाच, पाच सदस्यांचे घटनापीठ या मुद्दय़ांवर निर्णय घेईल, असे सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले. घटनापीठ विचार करणार असलेल्या प्रश्नांबाबत ३० मार्चला निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे असून त्यांना कमी लेखता येऊ शकणार नाही, असे न्या. एन.व्ही. रमण व न्या. धनंजय चंद्रचूड यांचाही समावेश असलेल्या खंडपीठाने सांगितले.

केंद्र सरकारने या मुद्दय़ाबाबत जे कायदेविषयक मुद्दे निश्चित केले आहेत, ते सर्व घटनात्मक मुद्दे असून त्यांच्याबाबत अधिक मोठय़ा पीठाने विचार करणे आवश्यक आहे, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.

या प्रकरणातील सर्व पक्षांनी त्यांचे कमाल १५ पानांचे लेखी निवेदन, तसेच केस लॉजचे सामायिक पेपर बुक पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत सादर करावे, जेणे करून पुनरुक्ती टाळता येईल असे खंडपीठ म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने शाहबानो प्रकरणात दिलेल्या निकालाचे नंतर काय झाले याकडे एका महिला वकिलाने लक्ष वेधले असता खंडपीठाने सांगितले की कुठल्याही प्रकरणाच्या नेहमी दोन बाजू असतात. आम्ही गेल्या ४० वर्षांपासून प्रकरणांवर निर्णय घेत आहोत. याही मुद्दय़ाबाबत आम्ही कायद्यानुसार निर्णय घेऊन, त्यापलीकडे नाही.

मुस्लिमांमधील तिहेरी तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नित्व या प्रथांच्या कायदेशीर बाजूवर आम्ही निर्णय देऊ; तथापि मुस्लीम कायद्यान्वये दिला जाणारा घटस्फोट हा कार्यपालिकेच्या अखत्यारितील विषय असल्याने न्यायालयांनी त्यावर देखरेख करावी काय या प्रश्नावर आम्ही विचार करणार नाही, असे न्यायालयाने गेल्या सुनावणीत सांगितले होते.

एखाद्या इसमाने पत्नीला तिहेरी तलाक दिल्यानंतर, तिने दुसऱ्या इसमाशी लग्न केले असेल आणि नंतर तिचा नवा पती मरण पावला किंवा त्याने तिला घटस्फोट दिला असेल तरच आधीचा पती तिच्याशी लग्न करू शकतो, अन्यथा नाही असा ‘निकाह हलाला’चा अर्थ आहे.