उत्तर प्रदेशात रस्ता तयार करणाऱ्या एका कंपनीने असंवेदनशीलतेची सीमा पार केली आहे. आग्रामधील फतेहपूर रोड भागात रस्ता बनविण्याचे काम सुरु होते. हे काम आर.पी इन्फ्रावेन्चर प्रायव्हेट लिमिटेडकडून करण्यात आले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना रस्त्याचे काम करकाना कहर केला. रस्त्याच्या कडेला एक कुत्रा मृत अवस्थेत पडलेला होता. त्या कुत्र्याला बाजूला सारण्याऐवजी या कर्मचाऱ्यांनी त्याला तसेच ठेवून त्यावर बांधकाम केले. कंपनीच्या या असंवेदनशीलतेबद्दल नागरिकांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

या तक्रारीनंतर बांधलेला रस्ता खोदून कुत्र्याचे शव बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर पीडब्ल्यूडीने रस्ते निर्माण करणाऱ्या कंपनीला नोटीस बजावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ताजगंज क्षेत्रात रात्रीच्या वेळी काम सुरु असताना हा प्रकार घडला. यावेळी कर्मचाऱ्यांनी मृत कुत्र्यावर गरम डांबर आणि काँक्रीट ओतले. त्यानंतर त्यावरुन रो़ड रोलरही फिरवला. ही गोष्ट सकाळी लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी एकच गोंधळ घातला. याचवेळी त्याठिकाणी काही हिंदुत्ववादी लोकही जमा झाले. त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर आपला राग काढण्यास सुरुवात केली. ही गोष्ट पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर नव्याने बांधलेला रस्ता पुन्हा खोदला गेला. त्यातून कुत्र्याचे शव काढल्यानंतर हा रस्ता पुन्हा नव्याने बांधण्यात आला. त्यानंतर गोंधळ काही प्रमाणात कमी झाला. कंपनीला या गोष्टीमुळे नोटीसही पाठविण्यात आली आहे.