उमाकांत देशपांडे

अयोध्येत राम मंदिराचा पाया खोदताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने त्या दूर करण्यासाठी देशभरातील ‘आयआयटी’ तज्ज्ञांशी सल्लामसलत करण्यात येत आहे. या प्राथमिक विलंबामुळे राम मंदिर उभारणीचे काम २०२४ अखेरीपर्यंत किंवा २०२५मध्ये पूर्णत्वास जाण्याची चिन्हे असून ते वेगाने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या ५ ऑगस्टला झाले. मंदिराचा पाया बांधण्यासाठी मृदा चाचणी आणि खड्डे खोदण्याचे काम सुरू करण्यात आले होते. सुमारे २०० फूट खोदकाम करून खांब बसविण्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होते. मंदिरासाठी सुमारे १२०० खांब बसवण्यात येणार आहेत. मंदिराचे वजन आणि भूकंप किंवा अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे मंदिराचे कोणतेही नुकसान होऊ नये आणि ते एक हजार वर्षे टिकावे, असे नियोजन करून मजबूत पायाउभारणी करण्यात येत आहे.

पायाच्या खांबांना सुमारे ७०० टन वजन पेलावे लागेल, हे गृहीत धरून तेवढे वजन खांबावर ठेवले असता तो दोन सेंटिमीटरऐवजी चार सेंटिमीटर खोल गेला. शरयू तीरी मंदिर उभारणी होत असल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे तेथील मुरूम थोडा मऊ आहे. त्यामुळे मुंबई, रुरकी, गुवाहाटी, मद्रास या आयआयटी, सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट (रुरकी), नॅशनल जिओग्राफिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट (हैदराबाद) अशा दहा नामांकित संस्थांमधील तज्ज्ञांशी सल्लामसलत करण्यात येत आहे. त्यांनी पाया उभारणीत तांत्रिक दृष्टीने काही बदल सुचविले असून आता चुनखडी, कठीण दगड आणि सिमेंट काँक्रीट अशा तीन घटकांचा वापर करून पाया भक्कम करण्यात येणार आहे, अशी माहिती अयोध्येचे जिल्हाधिकारी अनुपकुमार झा यांनी दिली.

पाया उभारणीचे काम जूनपासून सुरू होणे अपेक्षित होते. करोना टाळेबंदी आणि नंतर मृदा चाचणी व पायाबांधणी चाचण्यांमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे काही महिन्यांचा विलंब झाला आहे. रामजन्मभूमी मंदिर न्यासाने, पायाबांधणीचे काम सुरू झाल्यावर मंदिर उभे राहण्यास ३९ महिन्यांपर्यंत कालावधी लागेल, असे जाहीर केले आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पुढील काही दिवसांमध्ये पाया बांधणीचे काम सुरू होणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कार्यशाळेत राममंदिराचे जे काम झाले आहे, त्यातील सुमारे ४० टक्के कामाचा मंदिर उभारणीत उपयोग होणार आहे, असे जिल्हाधिकारी झा यांनी नमूद केले.

मंदिर उभारणीचे काम सुरू असतानाच अयोध्येतील पायाभूत सुविधांचा मोठय़ा प्रमाणावर विकास करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्याच्या मंदिर परिसरातील रस्ते अरुंद असून त्यालगतची दुकाने अन्यत्र स्थलांतरित करून रस्ते मोठे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या दररोज सरासरी १०-१५ हजार रामभक्त मंदिरात दर्शन घेत असून सुट्टय़ांचे दिवस, सणासुदीला काही लाख भाविक अयोध्येत येतात. रामनवमीसारखे उत्सव, कार्तिक पौर्णिमेला होणाऱ्या १४ कोस परिक्रमेच्या कालावधीत अयोध्या परिसरात १२-१५ लाख भाविक येतात. मंदिर उभारणीनंतर रामभक्तांचा ओघ वाढणार असून परिसरात अशा उत्सवाच्या वेळी ५० लाखांपर्यंत रामभक्त येतील, अशा रीतीने रस्ते, भक्तनिवास, प्रसादालये, हॉटेल्स, वीज, पाणी व अन्य सुविधा उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. अयोध्या परिसरात ६५ किमीचा गोलाकार मार्ग (रिंग रूट) बांधला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच यासंदर्भातील प्रस्तावांना मान्यता मिळेल, असे जिल्हाधिकारी झा यांनी सांगितले.

अयोध्या रेल्वे स्थानक विस्तारीकरण, रेल्वेमार्ग वाढविणे, विमानतळ उभारणी ही कामेही मंदिर उभारणी सुरू असताना पार पडतील आणि लाखो भाविकांना चांगल्या दर्जाच्या सेवासुविधा उपलब्ध होतील, यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

१२०० हेक्टरवर अयोध्या नवनगरी

* मंदिर उभारल्यानंतर मोठय़ा उत्सवाच्या काळात अयोध्या परिसरात सुमारे ४० ते ५० लाख भाविक उपस्थित राहू शकतात, हे गृहीत धरून बरेरा, शहानवाझपूर आणि तिपुडा या गावांतील सुमारे १२०० हेक्टरवर अयोध्या नवनगरी साकारली जाणार आहे.

* देशातील प्रत्येक राज्याला दिल्लीप्रमाणे अयोध्येत आपल्या राज्याचे भवन उभारावयाचे असल्यास जागा देण्यात येणार आहे. कर्नाटकसह तीन राज्यांनी त्यात रस दाखविला आहे.

* रामकृष्ण मिशनसारख्या देशभरातील नामांकित आध्यात्मिक, सामाजिक संस्थांना भक्तनिवास आणि यात्रेकरूंसाठी सुविधा उभारण्यासाठीही जागा देण्यात येणार आहे.

* देशभरातील बडय़ा हॉटेल्सनी आणि उत्तर प्रदेशातील हॉटेल्सनीही व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.