न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल झालेली असताना स्टॅडअप कॉमेडियन कुणाल कामराचं आणखी एक ट्विट वादात सापडलं आहे. कुणाल कामराने सरन्यायधीशांविषयी ट्विट केलं होतं. या प्रकरणी अवमान खटला चालविण्याची मागणी करण्यात आली होती. त्याला अॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी परवानगी दिली आहे.

स्टॅडअप कॉमेडियन कुणाल कामराने काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाविषयी टिप्पणी करणार ट्विट केलं होतं. या ट्विटवर आक्षेप घेत कामराविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण चर्चेत असतानाच कामराने आणखी हातांच्या बोटांचा फोटो शेअर करत सरन्यायाधीशांविषयी अपमानास्पद ट्विट केलं होतं.

कामराच्या या ट्विटविरोधात अवमानना याचिका दाखल करण्यासाठी अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांच्याकडे संमती मागण्यात आली होती. वेणुगोपाल यांनी कामराविरोधात अवमानना याचिका दाखल करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे कामराच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर कुणाल कामराने न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्यावर टीका करणार ट्विट केलं होतं. अर्णब गोस्वामीच्या जामीनाला विरोध करत कामराने सर्वोच्च न्यायालयावर टीका केली होती. याप्रकरणीही कुणाल कामरावर अवमानना खटला दाखल करण्यात आला आहे.

ट्विट हटवणार नाही, माफीही मागणार नाही

पहिल्या ट्विट प्रकरणी अवमानना खटला दाखल झाल्यानंतर कामराने भूमिका मांडली होती. “मी केलेलं ट्विट हटवणार नाही वा त्यासाठी माफीही मागणार नाही. मला वाटतं की, मी आपल्यासाठीच बोलतो आहे. कोणताही वकील ठेवणार नाही. माफीही मागणार नाही. दंडही भरणार नाही. वेळेचा अपव्यय करणार नाही,” असं कामराने यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या अवमानना खटल्यावर म्हटलं होतं.