देशात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांचे काम जोरात सुरु आहे. ही कामे गतीने होत आहेत. मात्र गतीच्या नावाखाली कोणत्याही कंत्राटदाराने भ्रष्टाचार करण्याचा विचारही मनात आणू नये. कारण जर या कामांमध्ये भ्रष्टाचार आढळला, तर त्या कंत्राटदाराला बुलडोझरखाली टाकून देण्यात येईल, असा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. भोपाळमधील एक सभेत ते बोलत होते.

महामार्ग हे लोकांच्या सोयीसाठी असतात. वाहतूक सुकर करण्यासाठी हे महामार्ग उपयुक्त असतात. त्यामुळे महामार्गाच्या कामात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही आणि तरीदेखील बांधकामात कोणतीही अनियमितता आढळून आली तर कंत्राटदारांना बुलडोझरखाली टाकण्याची शिक्षा देण्यात येईल, अशी ताकीद त्यांनी दिली.

महामार्गांच्या कामाला गती असायलाच हवी. तसेच गुणवत्ताही लक्षात घ्यायला हवी. महामार्गांच्या निर्मितीसाठी पुरेसा निधी देण्यात येत आहे. मात्र, या कामात भ्रष्टाचार सहन करण्यात येणार नाही, असा सज्जड दम त्यांनी राष्ट्रीय महामार्ग तयार करणाऱ्या कंत्राटदारांना भरला.

ज्यावेळी तंत्रज्ञानाची उणीव भासते आणि त्याचा वापर करण्याचे तंत्र नीटसे माहिती नसते, त्यावेळी त्याचा परिणाम महामार्गाच्या गुणवत्तेवर होतो. प्रकल्पांची कामे चांगली झाली, तरच देशाची प्रगती होईल. मी शेतकरी आहे. माझे चार साखर कारखाने आहेत. कर्जाच्या ओझ्याखाली ते दबले आहेत. हे कारखाने बंद झाले, तर भाजपच्या हातून तेथील चार लोकसभा मतदारसंघ जातील, असे सूचक विधानही त्यांनी केली.