प्रतिबंधित क्षेत्रात निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करा, गर्दीवर नियंत्रण ठेवा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिल्या आहेत. रात्रीची संचारबंदी लागू करण्याची मुभा राज्यांना असून, प्रतिबंधित क्षेत्राबाहेर टाळेबंदी लागू करण्यासाठी मात्र केंद्राची परवानगी आवश्यक आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी डिसेंबर महिन्यासाठी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट केले.

देशात करोनाची मोठी रुग्णवाढ होऊ लागली असून, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, गुजरात अशा काही राज्यांनी करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी रात्रीची संचारबदी लागू केली आहे. या पाश्र्चभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून, त्या १ डिसेंबरपासून महिनाअखेरपर्यंत लागू राहतील. राज्यांना रात्रीची संचारबंदी यासारखे स्थानिक निर्बंध लागू करता येतील. नियमभंग करणाऱ्यांविरोधात राज्यांना दंडात्मक कारवाई करण्यास व आवश्यकता असेल तर दंडात वाढ करता येईल, असे सूचनापत्रात नमूद करण्यात आले आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात देखरेख ठेवण्याची जबाबदारी प्रामुख्याने जिल्हा व महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निश्चित करण्यात आली आहे. अंमलबजावणीत कसूर झाल्यास अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल. केंद्राने प्रतिबंधित क्षेत्रांच्या आरेखनावर लक्ष केंद्रीत केले असून राज्य व स्थानिक प्रशासनाने सूक्ष्म व्यवस्थापन करण्याची सूचना केली आहे. प्रतिबंधित  क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, बाहेरील व्यक्तींच्या प्रवेशावर पूर्ण नियंत्रण असेल. प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी जाऊन करोना रुग्णांसंदर्भात सव्‍‌र्हेक्षण व नमुना चाचण्या केल्या जातील. रुग्णांचे तातडीने विलगीकरण केले गेले पाहिजे, असाही आदेश केंद्राने दिला आहे.

बाजारपेठा, बसगाडय़ा व अन्य सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यावरही भर देण्यात आला असून यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय विशिष्ट मार्गदर्शक सूचना जाहीर करणार आहे. त्याआधारे राज्य सरकारांना गर्दीवर नियंत्रण आणता येईल व कठोर कारवाईही करता येईल. विमान, रेल्वे व बसगाडय़ांच्या वाहतुकीसंदर्भात यापूर्वीच सूचना प्रसिद्ध केल्या आहेत, त्याआधारे राज्यांनी सार्वजनिक वाहतुकीचे नियमन करावे, असे केंद्राने म्हटले आहे.

आठवडय़ाभरातील संसर्गदर १० टक्कय़ांपेक्षा जास्त असलेल्या ठिकाणी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावर बोलवू नये. सरकारी कार्यालयांमध्ये अंतर नियम पाळला पाहिजे. राज्यांतर्गत किंवा आंतरराज्य प्रवासावर कोणतेही निर्बंध नसून, ई-परवान्याची गरज नसेल, असे केंद्राने म्हटले आहे.

निर्बंध कायम

* आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाला केंद्राने ठरवून दिलेल्या नियमांच्या आधारे मुभा

* चित्रपटगृहे, नाटय़गृहांचा निम्म्या क्षमतेने वापर.

* प्रशिक्षणासाठी जलतरण तलावांचा वापर

* व्यापारी उद्देशांसाठी प्रदर्शन सभागृहांना मुभा

* सामाजिक, धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक समारंभासाठी निम्म्या क्षमतेने सभागृहांचा वापर, कमाल उपस्थिती मर्यादा २००.

रुग्णसंख्या ९२ लाखांवर

देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ४४,३७६ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या ९२ लाखांवर गेली आहे. त्यातील ८६ लाख ४२ हजार रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या ४,४४,७४६ आहे. दिवसभरात ४८१ रुग्णांचा मृत्यू झाल्याने करोनाबळींची एकूण संख्या १,३४,६९९ वर पोहोचली आहे.