सुरक्षा कडे तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांची डोकी फोडण्याचा पोलिसांना आदेश देताना अलीकडेच चित्रीकरण करण्यात आलेले कर्नालचे उपविभागीय दंडाधिकारी आयुष सिन्हा यांची हरियाणा सरकारने बदली केली आहे. त्यांच्यासह १९ आयएएस अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या करण्यात आल्या.

सिन्हा यांची नागरिक संसाधन माहिती विभागाचे अतिरिक्त सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली असल्याचे बदलीच्या आदेशात म्हटले आहे. हरियाणात शनिवारी भाजपच्या बैठकीला विरोध करण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. यावेळच्या दृश्यफितीमध्ये (व्हिडीओ क्लिप) सिन्हा यांचे चित्रीकरण झाले होते. ‘सगळ्यांना उचलून ठोकून काढा. त्यांना आम्ही हे सुरक्षा कडे भेदू देणार नाही. आमच्याकडे पुरेसे बळ आहे. गेले दोन दिवस आम्ही झोपलेलो नाही. पण तुम्ही मात्र झोप घेऊन येथे आला आहात. एकही शेतकरी येथून निघून जायला नको. कुणी तसा प्रयत्न केला, तर त्याचे डोके फोडले जाईल याची निश्चिती करा. तुम्हाला हे कळले असेल अशी मला आशा आहे’, असे सिन्हा म्हणत असल्याचे यात ऐकू येते.

हरियाणाचे मुख्य सचिव विजय वर्धन यांनी मंगळवारी कर्नालच्या उपायुक्तांकडून शनिवारच्या पोलीस लाठीमाराबाबत अहवाल मागवला होता. १९१८च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असलेल्या आयुष सिन्हा यांची शब्दांची निवड चुकीची होती, असे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी यापूर्वी मान्य केले होते, मात्र पोलिसांच्या कारवाईचे त्यांनी समर्थन केले होते. उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनीही सिन्हा यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त करताना त्यांच्यावर कारवाईचे आश्वासन दिले होते.