व्यापम प्रकरणात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व ललित मोदी प्रकरणात राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे तसेच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा बचाव करण्याचे सत्ताधारी भाजपने ठरवले आहे. यापैकी कुणाचाच राजीनामा घेण्याची चिन्हे नाहीत. मध्य प्रदेशकडे निघालेले शिवराजसिंह चौहान यांचे विमान खराब हवामानामुळे उतरवण्यात आले व नंतर ते व्यावसायिक विमानाने परत दिल्लीला परतल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेतील अशी शक्यता आहे. वसुंधरा राजे व चौहान यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन भूमिका स्पष्ट केली.
अमित शहा यांनी रविवारी, केंद्रीय मंत्री अरुण जेटली, सुषमा स्वराज, स्मृती इराणी, रविशंकर प्रसाद व पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली, तसेच ते पक्ष प्रवक्त्यांशीही बोलले. स्वराज, चौहान व वसुंधरा राजे या कुणाचेच राजीनामे घेतले जाणार नाहीत तरी मंगळवारी सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात या तिघांच्याही राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केल्यास त्यांना शरण जायचे नाही, असे भाजपने ठरवले आहे.
सुषमा स्वराज, शिवराजसिंह चौहान व वसुंधरा राजे यांचे राजीनामे घेण्यासाठी काँग्रेस पक्ष इरेला पेटला आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीत अडकलेले आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांना मदत केल्याच्या प्रकरणात वसुंधरा राजे व सुषमा स्वराज अडकल्या आहेत, तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे व्यापम घोटाळ्यात अडकले आहेत.
अमित शहा यांनी प्रवक्ते एम. जे. अकबर व श्रीकांत शर्मा तसेच संबित पात्रा यांची भेट घेतली. स्मृती इराणी यांना खोटय़ा शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मुद्दय़ावर अडचणीत आणण्याचे काँग्रेसने ठरवले आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनाही तांदूळ घोटाळ्यात अडचणीत आणण्याचा विचार आहे. भाजप हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा मुद्दा काढून काँग्रेसला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करील.

रालोआची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक बोलावली असून त्या वेळी संसदीय कामकाजमंत्री एम. व्यंकय्या नायडू व लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी सर्वपक्षीय बैठकाही बोलावल्या आहेत. पावसाळी अधिवेशनात एकूण ३५ विषय मांडले जाणार असून राज्यसभेतील नऊ व लोकसभेतील चार प्रलंबित विधेयके , याशिवाय ११ नवीन विधेयके मांडली जाणार आहेत.