News Flash

कंगना-शिवसेना वादावर वाराणसीत झळकलं वादग्रस्त पोस्टर; महाभारतातील ‘वस्त्रहरण’ प्रसंगाचा वापर

उद्धव ठाकरेंना दु:शासन तर मोदींना दाखवलं कृष्ण

कंगना रणौत आणि शिवसेना यांच्यात निर्माण झालेल्या वादावर शिवसेनेकडून आता पडदा टाकण्यात आला असला तरी याचे राजकीय पडसाद अद्याप उमटतच आहेत. बिहार आणि हिमाचल प्रदेशनंतर आता उत्तर प्रदेशातूनही शिवसेनेवर टीका टिपण्णी सुरु झाली आहे. या वादावर वाराणसीत एक वादग्रस्त पोस्टर झळकलं आहे. महाभारतातील ‘वस्त्रहरण’ प्रसंगावरील या पोस्टरमध्ये अभिनेत्री कंगना रणौतला द्रौपदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दु:शासन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृष्ण दाखवण्यात आलं आहे.

वाराणसीतील स्थानिक वकील श्रीपती मिश्रा यांनी हे पोस्टर झळकवलं आहे. या पोस्टरबाबत सांगताना मिश्रा म्हणाले, “कंगना आणि शिवसेना वादामध्ये महाराष्ट्र शासन कौरव सेनेप्रमाणे वागत आहे. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीचं देशातील महिलांचा आत्मसन्मानाचं संरक्षण करु शकतात.” या वादावर शांत राहिल्याबद्दल त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही टीका केली आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात भाष्य करताना कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगनाला मुंबई असुरक्षित वाटत असेल तर सोडून जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर कंगनानेही त्यांना ट्विटद्वारे आव्हान दिलं होतं. दरम्यान, बुधवारी बीएमसीनं कंगनाच्या पालीहिल्स येथील कार्यालयाच्या काही बांधकाम अनधिकृत असल्याचं सांगत कारवाई केली होती.

बीएमसीच्या कारवाईनंतर भडकलेल्या कंगनाने एका व्हिडिओ मेसेजद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला होता. त्यानंतर हे प्रकरण आणखीनच चिघळत चालल्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, संजय राऊत यांनी आपल्याला यापुढे या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नसून कंगनापेक्षा सध्याची करोनाची परिस्थिती जास्त महत्वाची असल्याचं म्हटलं आणि या वादावर पडदा टाकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 7:54 pm

Web Title: controversial poster on kangana shiv sena dispute flashed in varanasi the use of varstraharan in the mahabharata aau 85
Next Stories
1 अखिल भारतीय आखाडा परिषदेचा कंगनाला पाठिंबा; राज्य शासनावर केली टीका
2 चीनची दादागिरी मोडण्यासाठी भारत-जपान एकत्र, दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचा करार
3 सुशांतच्या मृत्यूचा भाजपाकडून राजकीय ट्रम्प कार्डसारखा वापर-काँग्रेस
Just Now!
X