सर्वोच्च न्यायालयासंबंधात ट्वीटरवर विधाने करताना आपण वापरलेली भाषा ही न्यायालयाचा अवमान करण्याच्या हेतूने नव्हे, तर जनमानसात चर्चिल्या जाणाऱ्या मुद्दय़ांवर अधिक गांभीर्याने चर्चा घडावी, या उद्देशाने वापरली आहे. विनोदनिर्मिती करताना थट्टा आणि अतिशयोक्तीचा आधार घ्यावा लागतो, अशी भूमिका स्टॅण्ड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात मांडली.

आपण मर्यादा ओलांडली आहे असे न्यायालयास वाटत असेल आणि न्यायालयाला आपली इंटरनेट सेवा बेमुदत काळासाठी बंद करण्याची इच्छा असेल तर काश्मीरमधील मित्रांप्रमाणे आपणही दरवर्षी १५ ऑगस्टला पोस्टकार्डावर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा पाठवू, असे कामरा यांनी म्हटले आहे.

आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यात उच्च न्यायालयाने हंगामी जामीन नाकारल्यानंतर गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावेळी कामरा यांनी ही विधाने केली होती.

अतिशयोक्तीपूर्ण अलंकारिक घटक हे विनोदी कार्यक्रमासाठी आवश्यक आहेत आणि विनोदवीर स्वत:च्या खास शैलीने जनहिताचे प्रश्न मांडत असतो. देशातील सामर्थ्यवान व्यक्ती आणि संस्था यांच्यात टीका सहन करण्याची क्षमता नसेल, तर येथील कलावंतांची प्रतिभा बंदिस्त करून त्यांचे पाळीव श्वानात रूपांतर केल्यासारखे होईल, असे मतही कामरा यांनी न्यायालयापुढे व्यक्त केले आहे.

कामरा यांच्यावर न्यायालयाच्या अवमानप्रकरणी कारवाई करावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी त्याने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. अनेक न्यायालयांनी अनेक प्रकरणांत दिलेले निकाल कदाचित आपल्याला मान्य नसतील, परंतु या पीठाचा जो निर्णय असेल तो आपण सुहास्यवदनाने स्वीकारू, या पीठाचा किंवा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करणार नाही, असे आश्वासन कामरा यांनी दिले आहे.

‘टीकेचे वाढते प्रमाण’

न्यायालयावर टीका करण्याचे प्रमाण वाढत असून आता प्रत्येक जण टीका करू लागला आहे, असे निरीक्षण शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले. न्यायपालिकेविरुद्ध निंदनीय ट्वीट केल्याबद्दल व्यंगचित्रकार रचिता तनेजा हिच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका करण्यात आली आहे. त्याबाबत म्हणणे मांडण्यासाठी न्यायालयाने रचिता तनेजा हिला तीन आठवडय़ांची मुदत दिली आहे.