लसीकरण झालेल्या व्यक्तींच्या रक्तामध्ये गुठळ्या तयार झाल्याचे काही प्रकार समोर आल्यानंतर युरोपमधील बऱ्याच देशांनी आता अ‍ॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड लशीचा वापर तात्पुरता थांबविला आहे. काही देशांमध्ये लशीचा वापर थांबवण्याबाबत आढावा घेण्यात येत आहे. या लशीबाबत अधिक चिकित्सा सुरू असतानाच करोनाला प्रतिबंधित करण्याचे या लशीचे फायदे हे दुष्परिणामांच्या जोखमीपेक्षा जास्त असल्याचे युरोपच्या नियामक मंडळाने म्हटले आहे.

कोणत्या देशांनी लशीचा वापर तात्पुरता थांबवला होता?

फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, डेन्मार्क, नॉर्वे, आइसलँड, ऑस्ट्रिया, एस्टोनिया, बल्गेरिया, रोमानिया, एस्टोनिया, लिथुआनिया, लक्झेंबर्ग आणि लॅटव्हिया या देशांनी अ‍ॅस्ट्राझेनेका लशीचा वापर तात्पुरता थांबवला होता. युरोपियन मेडिसिन एजन्सी (ईएमए)च्या तज्ज्ञांनी लशीच्या वापरास दिलेली तात्पुरती स्थगिती ही ‘सावधगिरीचा उपाय’ असून त्यासंदर्भात आणखी पडताळणी केली जात असल्याचे या देशांनी म्हटले होते.

‘ईएमए’ कोणता तपास  करीत आहे?

ऑस्ट्रियातील एका व्यक्तीला अ‍ॅस्ट्राझेनेका लस दिल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार झाल्याचे आढळून आले. या व्यक्तीचा १० दिवसांनी मृत्यू झाल्यानंतर ऑस्ट्रियाच्या औषध नियामक प्राधिकरणाने लशीचा वापर थांबवला. लसीकरणानंतर दुसऱ्या एका व्यक्तीला फुप्फुसातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती ‘ईएमए’ने १० मार्च रोजी दिली. एकूणच, युरोपियन आर्थिक क्षेत्रातील ३० लाख जणांना अ‍ॅस्ट्राझेनेका लस देण्यात आली. त्यापैकी २२ जणांना रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होण्याचा त्रास झाल्याचे आढळून आले आहे. युरोपियन महासंघातील १७ देशांमध्ये लशीच्या ‘एबीव्ही ५३००’ संचाचा पुरवठा करण्यात आला असून त्यात १० लाख मात्रांचा समावेश आहे. या टप्प्यावर लशीच्या गुणवत्तेत दोष आढळला नसला तरी संचाच्या गुणवत्तेची तपासणी केली जात आहे, अशी माहिती ‘ईएमए’ने दिली आहे.

तपासात प्रगती किती?

रक्तपेशींची संख्या कमी असणाऱ्या काही लोकांना लसीकरण केल्यानंतर रक्तात गुठळ्या तयार होण्याचा त्रास झाला. मात्र ही संख्या अतिशय नगण्य असल्याचे ईएमएने १५ मार्च रोजी म्हटले आहे. युरोपीय महासंघात दरवर्षी हजारो लोकांना वेगवेगळ्या कारणांमुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा त्रास होतो. त्या तुलनेत लसीकरणानंतर हा त्रास झालेल्यांची संख्या निश्चितच कमी आहे, असे ‘ईएमए’ने अधोरेखित केले. येत्या काही दिवसांमध्ये रक्त विकारांशी संबंधित तज्ज्ञांकडून रक्ताच्या गुठळ्या होण्याबाबतच्या घटनांशी संबंधित सर्व माहितीचे अतिशय काटेकोरपणे विश्लेषण केले जाईल, असे ‘ईएमए’ने सांगितले.

नियामक अधिकाऱ्यांचे निरीक्षण काय आहे?

ऑस्ट्रिया : ऑस्ट्रियामधील फेडरल ऑफिस फॉर सेफ्टी इन हेल्थ केअर (बीएएसजी)ने ७ मार्च रोजी सांगितले की, झ्वेट्टेलमध्ये एकाच संचामधील (एबीव्ही ५३००) लसीकरणाबाबतच्या दोन घटना समोर आल्या आहेत. एका ४९ वर्षीय महिलेचा रक्तातील गुठळ्यांमुळे मृत्यू झाला, तर एका ३५ वर्षीय महिलेच्या फुप्फुसातील रक्तवाहिन्यांमधील अडथळा निर्माण झाला होता. तिची स्थिती सुधारत असल्याचे सांगण्यात आले. मात्र दोन्ही प्रकरणांतील आजारांचा लसीकरणाशी संबंध असल्याचा कोणताही पुरावा नाही.

डेन्मार्क : रक्ताच्या गुठळ्यांमुळे मृत्यू झाल्याचा एक अहवाल प्राप्त झाला आहे आणि त्याची चिकित्सा केली जात आहे, असे ११ मार्च रोजी डॅनिश मेडिसिन एजन्सीने सांगितले. ‘रक्ताच्या गुठळ्यांमुळे झालेल्या मृत्यूची नोंदीचा आणि लशीचा काही संबध आहे की नाही हे आम्हाला अद्याप माहिती नाही, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून याची कसून चिकित्सा केली पाहिजे,’ असे डॅनिश मेडिसिन एजन्सीचे विभागप्रमुख तंजा एरिचसेन यांनी सांगितले. ज्या लोकांना गेल्या १४ दिवसांत अ‍ॅस्ट्राझेनेका लस दिली गेली आहे आणि ज्यांना लसीकरणामुळे तीन दिवसांपेक्षा जास्त काळ लक्षणे आढळतात त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. त्याचप्रमाणे, लसीकरणानंतर पहिल्याच दिवसांत उद्भवणारा कोणताही तात्पुरता त्रास होऊन गेल्यानंतर १४ दिवसांपर्यंत नवीन लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,’ असे एरिचसेन यांनी म्हटले आहे.

अ‍ॅस्ट्राझेनेकाचे म्हणणे काय?

युरोपीय महासंघ आणि ब्रिटनमध्ये एकूण एक कोटी ७० लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले. त्या सर्वाच्या उपलब्ध माहितीचा आढावा घेतला असता विशिष्ट वयोगटात, स्त्री-पुरुष किंवा विशिष्ट  देशातील रुग्णांच्या रक्तात अथवा फुप्फुसातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याची लक्षणे आढळून आली नाहीत, असे अ‍ॅस्ट्राझेनेकाने १४ मार्च रोजी सांगितले. तत्पूर्वी ८ मार्चपर्यंत  युरोपीय महासंघ आणि ब्रिटनमध्ये लस देण्यात आलेल्यांमध्ये रक्तात गुठळ्या होण्याचे १५ आणि फुप्फुसातील रक्तवाहिन्यांमधील अडथळ्याच्या २२ घटना घडल्या आहेत. ही आकडेवारी एकूण लसीकरण झालेल्या लोकांच्या तुलनेत अतिशय नगण्य अशीच आहे, असे अ‍ॅस्ट्रॉझेनेकाने स्पष्ट केले आहे.

युरोप किंवा जगातील इतर देशांमध्ये वापरण्यात आलेल्या आमच्या लशींबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. लशीच्या अतिरिक्त चाचण्या करण्यात आल्या आहेत आणि अद्याप सुरू आहेत. युरोपीय आरोग्य यंत्रणांद्वारेही या चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये काळजी करण्यासारखे काही आढळून आले नाही. लसनिर्मितीदरम्यान अ‍ॅस्ट्राझेनेका आणि त्यांचे भागीदार असलेल्या २०हून अधिक प्रयोगशाळांद्वारे ६०हून अधिक गुणवत्ता चाचण्या केल्या जातात, असे कंपनीचे म्हणणे आहे.

भारतातील यंत्रणांची भूमिका

भारतात सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेतील दोन लशींपैकी सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाची कोव्हिशिल्ड ही लस अ‍ॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड लशीची आवृत्ती आहे. या लशीच्या सुरक्षिततेबाबत नॅशनल अ‍ॅडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन समितीचे (एईएफआय) सदस्य आणि जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ डॉ. एन.के. अरोरा यांनीही दुजोरा दिला. शरीराच्या कुठल्याही अवयवात गुठळ्या आढळतात. त्यामुळे या घटनांना त्या दृष्टीनेही पडताळून पाहायला हवे, असे अरोरा यांनी सांगितले. एईएफआय समिती दुष्परिणामांशी संबंधित चार प्रमुख मुद्दय़ांकडे प्रामुख्याने लक्ष देत आहे. त्यात मृत्यूची कारणे आणि रुग्णालयातील उपचार, या दरम्यान गुठळ्या होणाऱ्या काही घटनांची नोंद आहे का, म्हणजे अपेक्षित प्रमाणापेक्षा या नोंदी अधिक असल्यास ती चिंतेची बाब ठरेल. या घटना काही विशिष्ट लशींबाबत आहेत का, ही पडताळणी आम्ही करत आहेत, असे अरोरा यांनी स्पष्ट केले आहे.