काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनमध्ये एक खासगी कंपनी सुरू करण्यासाठी ब्रिटनचे नागरिकत्व घेतले होते. त्या कंपनीच्या दस्तऐवजांवर राहुल गांधी यांचे नागरिकत्व ब्रिटिश असे नोंदविण्यात आले असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सोमवारी येथे एका पत्रकार परिषदेत केला.
भारतात दुहेरी नागरिकत्व बेकायदा आहे. त्यामुळे केंद्राने राहुल यांचे नागरिकत्व रद्द करावे, अशी मागणी स्वामी यांनी केली आहे. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत ‘ब्लॅक ऑप्स लि.’ या कंपनीची कागदपत्रे सादर केली. त्यात गांधींनी आपली जन्मतारीख योग्य नोंदवली आहे, मात्र नागरिकत्व ब्रिटिश असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे ब्रिटनचा पत्ताही दिला आहे, असेही ते म्हणाले. या प्रकारामुळे देशातील कायद्याचा भंग झाला आहे, याबाबतचे पुरावे मिळाले तर गांधी यांचे नागरिकत्व आणि खासदारकी रद्द करावी, अशी मागणी करणारे पत्र डॉ. स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.