बाजारभावाने स्वयंपाकाचा गॅस घेणे परवडणारे नसल्याने कुंभमेळ्याच्या संपूर्ण कालावधीत यात्रेकरूंना सवलतीच्या दरात गॅस देण्यात यावा, असे आदेश तेल आणि नैसर्गिक वायुमंत्री वीरप्पा मोईली यांनी दिले आहेत़  यासंबंधीचा प्रस्ताव मोईली यांनी पारित केल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितल़े .
सध्या सवलतीच्या गॅसची किंमत दिल्लीमध्ये ४१० रुपये आहे आणि बाजारभाव ४८१ रुपये आह़े  शासनाच्या मूळच्या धोरणानुसार सवलतीचे गॅस केवळ घरगुती वापरासाठी देण्यात येतात़  त्याव्यतिरिक्त समूह स्वयंपाकघरे आणि हॉटेलसारख्या व्यावसायिक आस्थापनांना मात्र गॅस बाजारभावानेच देण्यात येतो़  सुरुवातीला हेच धोरण कुंभमेळ्याबाबत राबविण्यात आले; परंतु या निर्णयामुळे एलपीजीच्या जोडण्यांमध्ये मोठी घट झाली़  
२००१ सालच्या कुंभमेळात सात हजार जोडण्या झाल्या होत्या़  त्या तुलनेत या वर्षी केवळ ९३१ जोडण्या घेण्यात आल्या़  तसेच २००१ साली कुंभमेळ्यात ३३ हजार गॅस सिलेंडर्स वापरण्यात आले होते, तर या वर्षी केवळ ४ हजार सिलेंडर्सचा वापर करण्यात आला़  
यावर तोडगा काढण्यासाठी मोईली यांनी कुंभमेळ्याच्या ठिकाणी सवलतीचे गॅस देण्याचा निर्णय घेतला, असेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितल़े
यापूर्वी मोईली यांनी मासेमारी नौकांनाही सवलतीच्या दरात डिझेल पुरविण्याचे आदेश दिले होत़े  या मासेमारी नौकांना मोठे वापरकर्ते ठरवून डिझेल कंपन्या त्यांना बाजारभावापेक्षा १० रुपये अधिक दराने डिझेल विक्री करीत होत्या;  परंतु मोईली यांच्या आदेशाने मासेमारी नौका मोठे वापरकर्ते नसल्याचे स्पष्ट केल़े