‘त्या’ सहकारी बँकांवर भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी

शामलाल यादव, नवी दिल्ली

नोटाबंदीच्या काळात ज्या जिल्हा सहकारी बँकांमधून मोठय़ा प्रमाणावर नोटा बदलण्यात आल्या अशा पहिल्या दहा बँकांशी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांचा संबंध असल्याची माहिती ‘इंडियन एक्स्प्रेस’ला माहितीच्या अधिकाराखाली मिळाली आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या बँकांचे पदाधिकारी आहेत.

१० नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत देशातील ३७० जिल्हा सहकारी बँकांमधून चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या सुमारे २२२७० कोटी रुपये किंमतीच्या नोटा बदलण्यात आल्या. यापैकी १८.८२ टक्के (४१९१.३१ कोटी रुपये) नोटा पहिल्या १० क्रमांकांच्या बँकांमध्ये बदलल्या गेल्या, असे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेने (नाबार्ड) दिलेल्या माहितीत म्हटले आहे. या १० बँकांपैकी चार बँका गुजरातमधील, चार महाराष्ट्राती, तर प्रत्येकी एक बँक हिमाचल प्रदेश व कर्नाटकमधील आहे. ७४५.५९ कोटी रुपयांच्या नोटा बदलणारी अहमदाबाद

जिल्हा सहकारी बँक या यादीत अग्रस्थानी आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे या बँकेचे संचालक असून, याच पक्षाचे नेते अजयभाई पटेल हे तिचे अध्यक्ष आहेत. ६९३.१९ कोटी रुपयांच्या नोटा बदलणारी राजकोट जिल्हा सहकारी बँक दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातचे मंत्री जयेशभाई रडाडिया हे या बँकेचे अध्यक्ष आहेत.

या यादीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तिसऱ्या क्रमांकावर आहे. या बँकेने ५५१.६२ कोटी रुपयांच्या नोटा बदलल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात हे बँकेचे अध्यक्ष, तर काँग्रेसच्या नेत्या अर्चना गारे उपाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे बँकेच्या संचालकांपैकी एक आहेत.

३१९.६८ कोटी रुपयांच्या नोटा बदलणारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यादीत आठव्या क्रमांकावर आहे. शिवसेनेचे नेते नरेंद्र दराडे हे त्यावेळी बँकेचे अध्यक्ष होते. नोटाबंदीच्या परिणामांना तोंड देण्यात रिझव्‍‌र्ह बँक अपयशी ठरल्याचा आरोप करून त्यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये राजीनामा दिला होता.

या ३७० बँकांमधील ज्या ३१,१५,९६४ ग्राहकांनी जुन्या नोटा परत केल्या, त्यांची ओळख नाबार्डने पडताळून पाहिली असल्याचे बँकेने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.