उत्तरप्रदेशात दलित समाजातील दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून झाडाला टांगल्याची घटना ताजी असतानाच हमीपूर जिल्ह्यातील समशेरपूर पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱयांनीच एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
बदाऊन येथील सामूहिक बलात्कारप्रकरणाचा तपास सीबीआयकडे
उत्तरप्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सतत बलात्कार आणि खूनाच्या खळबळजनक घटना समोर येत आहेत. बदाऊन येथील क्रूर घटना आणि आता थेट पोलीस ठाण्यात घडलेला हा प्रकार यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत.
पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यात कैद असलेल्या आपल्या पतीला भेटण्यासाठी आलेल्या महिलेला बंदुकीचा धाक दाखवून पोलीस ठाण्याच्या चार कर्मचाऱयांनी पोलीस ठाण्यातच सामूहिक बलात्कार केला. पीडित महिलेने हमीपूरचे पोलीस अधिक्षक विरेंद्र शेखर यांच्याकडे झालेल्या संपूर्ण प्रकराची माहिती देऊन तक्रार दाखल केली. महिलेने दिलेल्या माहितीवरून पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला अटक करण्यात आली असून इतर तीन कर्मचाऱयांचा शोध घेण्यात येत आहे.
आणखी एका दलित महिलेचा मृतदेह झाडाला टांगला
दुसरीकडे उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक ए एल बॅनर्जी यांनी त्यापुढे जाऊन राज्यातील बलात्कार हे ‘नॉर्मल रुटीन’ असल्याचं जाहीर वक्तव्य करून आपल्या बेफीकरीपणाचे तारे तोडले आहेत. खुद्द पोलीस महासंचालकांनी असे वक्तव्य केल्यामुळे नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.