शुक्रवारी देशात आत्तापर्यंतची सर्वोच रुग्णसंख्या आणि २४ तासांतली जगातली सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली. गेल्या २४ तासांत देशात तब्बल ४ लाख १ हजार ९९३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, पुढच्या आठवड्यात देशभरात मोठ्या संख्येने रुग्णवाढ होण्याची शक्यता आहे, असा इशारा केंद्र सरकारला करोनासंदर्भात सल्ला देणाऱ्या पथकातील तज्ज्ञांनी दिला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या चर्चेदरम्यान, आपण दीर्घ काळासाठीच्या उपाययोजनांमध्ये फार वेळ न घालवता आत्ता उद्भवलेल्या परिस्थितीवर तातडीने पावलं उचलणं गरजेचं असल्याचा संदेश पथकानं केंद्र सरकारला दिला असल्याची माहिती पथकाचे प्रमुख एम. विद्यासागर यांनी दिली आहे. एकीकडे देशात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि लसीच्या डोसचा अपुरा पुरवठा असताना रुग्णवाढीचं आव्हान समोर उभं ठाकणार असल्याचा इशारा आता तज्ज्ञांनी दिला आहे.

काय म्हणणं आहे तज्ज्ञांचं?

केंद्र सरकारला करोनासंदर्भात सल्ला देणाऱ्या संशोधकांच्या पथकाचे प्रमुख एम. विद्यासागर यांनी यासंदर्भात राउटर्सशी बोलताना माहिती दिली आहे. “आमचा अंदाज आहे की पुढच्या आठवड्यात ३ ते ५ तारखेच्या दरम्यान भारतात रोजची सर्वोच्च करोना रुग्णसंख्या नोंदवली जाण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात २ एप्रिलला झालेल्या चर्चेदरम्यान आम्ही सांगितलं होतं की सरकारने जुलै किंवा ऑगस्टमध्ये अंमलात येईल अशा उपाययोजनांवर काम करणं अनावश्यक आहे. कारण तोपर्यंत दुसली लाट संपलेली असेल, पण पुढचे ४ ते ६ आठवडे आपण हा लढा कसा देणार आहोत, ते ठरवणं आवश्यक आहे. दीर्घकालीन उपाययोजना ठरवण्यात खूप सारा वेळ खर्च करू नका. कारण हे संकट आत्ता तुमच्या समोर उभं आहे”, असं ते विद्यासागर यांनी सांगितलं.

शनिवारी सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत तर भारतात तब्बल ४ लाख १ हजार ९९३ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे देशातल्या करोनाबाधितांची आत्तापर्यंतची एकूण संख्या आता १ कोटी ९१ लाख ६४ हजार ९६९ इतकी झाली आहे. यासोबतच गेल्या २४ तासांमध्ये देशात ३ हजार ५२३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू ओढवला आहे. एकूण मृतांचा आकडा देशात आता २ लाख ११ हजार ८५३ इतका झाला आहे. फक्त एप्रिल महिन्यातच देशात तब्बल ४५ हजार रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची भीषण आकडेवारी समोर आली आहे.

भारतात रुग्णसंख्येचा विस्फोट! २४ तासांत ४ लाखांहून जास्त रुग्णसंख्या नोंदवणारा पहिला देश!

महिन्याभरात देशात ४५ हजार मृत्यू!

१ एप्रिल रोजी देशातील एकूण करोना रुग्णसंख्या होती १,२३,०२,११५ आणि एकूण मृत्यू संख्या होती १,६३,४२८. तर देशभरात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या होती ६,१०,९२९ इतकी. ही सख्या ३० एप्रिल रोजी प्रचंड बदलून गेली. ३० एप्रिल रोजी देशातील एकूण करोना रुग्णांची संख्या पोहोचली १,८७,५४,९८४ आणि मृतांचा आकडा पोहोचला २,०८,३१३ वर. तर ३० एप्रिल रोजी देशभरात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या होती ३१,६४,८२५ इतकी! त्यामुळे वाढते मृत्यू रोखण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर उभं राहिलं आहे. त्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर यांच्या तुटवड्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होऊ लागली आहे.