उत्तराखंडमध्ये एप्रिल महिन्यात कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. करोनाच्या सावटामुळे यंदा कुंभमेळ्याचं महिन्याभराचंच नियोजन करण्यात आलं होतं. मात्र, कुंभमेळा सुरू असतानाच रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उर्वरीत कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवण्याची सूचना केली होती. मात्र, त्यानंतर देखील करोनाच्या रुग्णसंख्येला आळा घालणं कठीण ठरलं. कुंभमेळ्याच्या एप्रिल महिन्यामध्ये उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ झाली. त्यासोबतच करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमाणात देखील प्रचंड वाढ झाली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार उत्तराखंडमध्ये आत्तापर्यंत झालेल्या एकूण करोना मृत्यूंपैकी जवळपास निम्मे मृत्यू हे कुंभमेळ्यानंतर झालेले आहेत! त्यामुळे कुंभमेळ्यामुळेच उत्तराखंडमध्ये करोनाचं प्रमाण वाढलं का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

कुंभमेळ्याच्या काळात मोठी रुग्णवाढ!

१ एप्रिल ते ७ मे या कालावधीमध्ये उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ झाली. या कालावधीमध्ये उत्तराखंडच्या रुग्णसंख्यमध्ये तब्बल १ लाख ३० हजार नव्या रुग्णांची भर पडली आहे. हे प्रमाण देखील उत्तराखंडच्या एकूण रुग्णसंख्येच्या जवळपास निम्मे आहे. त्यासोबतच उत्तराखंडमध्ये आत्तापर्यंत झालेल्या मृत्यूंपैकी १७१३ मृत्यू हे १ एप्रिल ते ७ मे या दरम्यान झालेले आहेत. १ मे ते ७ मे या आठवड्याभरातच उत्तराखंडमध्ये तब्बल ८०६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. क्विंटने दिलेल्या आकडेवारीनुसार, एकट्या एप्रिल महिन्यात उत्तराखंडमधल्या रुग्णसंख्येत तब्बल १८०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दुसऱ्या लाटेला राजकारणीच जबाबदार?

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमित सिंह यांनी सांगितलं की, “जानेवारीमध्ये आपण सगळ्यांनी आपलं संरक्षण बाजूला सारत गर्दी करायला, धार्मिक कार्यक्रम करायला, लग्न-समारंभ करायला सुरुवात केली. हे व्हायला नको होतं. तेही करोनाच्या भारतीय प्रकाराचा प्रसार आधीच सुरू झाला आहे हे आपल्याला माहिती असून देखील! उत्तराखंडमध्ये देखील तेच झालं”!

“झोपेतून जागे व्हा आणि करोना काळात येणाऱ्या समस्यांचा सामना करा”

रुग्णांचा आकडा २ लाख २९ हजारांवर!

शुक्रवारी म्हणजेच ७ मे रोजी उत्तराखंडमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या ९ हजार ६४२ इतकी नोंदली गेली आहे. त्यामुळे आता उत्तराखंडमधील करोनाबाधितांचा एकूण आकडा २ लाख २९ हजार झाला आहे. कुंभमेळ्यातील शेवटचे शाही स्नान आटोपताच उत्तराखंड सरकारने निर्बंध देखील घातले आहेत.