संस्थात्मक करोना आरोग्य केंद्रांवरील ताण कमी करण्यासाठी निवासी संकुलात छोटे ‘कोव्हिड सेवा केंद्र’ उभारण्याची मुभा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. निवासी संकुलातील गृहनिर्माण संस्था वा स्वयंसेवी संस्था हे केंद्र सुरू करू शकतात.

आपल्या निवासी संकुलातील आरोग्य सेवा केंद्र रहिवाशांसाठी अधिक सोयीचे असू शकते. लक्षणे नसलेले वा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी या केंद्राचा वापर केला जाऊ  शकतो, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत.

केंद्रे कुठे, कशी उभारावीत?

निवासी संकुलातील मोकळी जागा, सभागृह, रिकामी सदनिका आदींचा केंद्र उभारण्यासाठी उपयोग करता येऊ  शकतो. केंद्रात जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र प्रवेशमार्ग आवश्यक. तापमापक, विषाणू प्रतिबंधक फवारणी यंत्रे आदी सुविधा आवश्यक. दोन खाटांमध्ये किमान तीन फूट अंतर ठेवणे आवश्यक. केंद्रे उभारताना हवा खेळती राहील याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

गंभीर रुग्णांना परवानगी नाही  : ज्येष्ठ नागरिक, १० वर्षांखालील बालके, गर्भवती, मधुमेह, हृदयरोग, मूत्रपिंड आजार, श्वसनविकार, कर्करोग आदी गंभीर आजारांच्या रुग्णांना निवासी संकुलातील छोटय़ा आरोग्य केंद्रात ठेवण्याची परवानगी नाही. त्यांना रुग्णालय वा नियमित करोना आरोग्यसेवा केंद्रांमध्ये दाखल करण्याची सूचना.

अटी आणि सूचना

* करोनाचे रुग्ण आणि संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र दालने असावीत, त्यांना एकत्र ठेवू नये.

* दोन्ही प्रकारच्या रुग्णांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सुविधा आवश्यक.

* ही केंद्रे वैद्यकीय सर्वेक्षण चमू, अ‍ॅम्ब्युलन्स सेवापुरवठा केंद्रांशी संलग्न असावीत.

* संबंधित गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, आरोग्य सेवक, अ‍ॅम्ब्युलन्स यांचे संपर्क क्रमांक फलकावर लावणे बंधनकारक.

गंभीर रुग्णांना परवानगी नाही  : ज्येष्ठ नागरिक, १० वर्षांखालील बालके, गर्भवती, मधुमेह, हृदयरोग, मूत्रपिंड आजार, श्वसनविकार, कर्करोग आदी गंभीर आजारांच्या रुग्णांना  संकुलातील छोटय़ा आरोग्य केंद्रात ठेवण्याची परवानगी नाही. त्यांना  नियमित करोना आरोग्यसेवा केंद्रांमध्ये दाखल करण्याची सूचना.

रुग्णांची वैद्यकीय तपासणी : निवासी संकुलातील करोना आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर आणि आरोग्य सेवक उपलब्ध असणे आवश्यक. केंद्रात दाखल झालेल्या रुग्णांची दररोज वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक. डॉक्टर आणि आरोग्य सेवक यांना करोनासंदर्भातील प्रशिक्षणही द्यावे. रुग्णांनी केंद्रातून पळ काढू नये यासाठी कॅमेऱ्याद्वारे देखरेख ठेवावी.