ब्रिटनच्या पंतप्रधानांकडून माहिती; सध्याच्या लशी परिणामकारक असल्याचाही निर्वाळा

ब्रिटनमध्ये गेल्या वर्षीच्या अखेरीस आढळून आलेला करोनाचा उत्परिवर्तीत विषाणू जास्त घातक असून तसे पुरावे मिळाले असल्याची माहिती पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली आहे.

नवीन विषाणूच्या धोक्यांबाबत माहिती देणाऱ्या सल्लागार गटाने दिलेल्या तपशिलाच्या आधारे जॉन्सन यांनी सांगितले की, करोनाचा नवा प्रकार जास्तच घातक आहे. असे असले तरी फायझर-बायोएनटेक व ऑक्सफर्ड- अ‍ॅस्ट्राझेनेका यांच्या लशी त्यावर परिणामकारक आहेत. हा विषाणू वेगाने पसरणारा असून आता त्याचे पुरावे मिळाले आहेत.  हा विषाणू पहिल्यांदा लंडन व आग्नेय इंग्लंड भागात सापडला होता, त्याचा मृत्युदर अधिक आहे.

जॉन्सन यांनी शुक्रवारी १० डाउनिंग स्ट्रीट येथे आभासी पद्धतीने या विषाणूबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, या नव्या विषाणूच्या प्रसारामुळे राष्ट्रीय आरोग्य सेवेवर खूप ताण आला.  सध्याचे सर्व पुरावे हे लस ही जुन्या व नवीन विषाणूवर प्रभावी आहे हे दाखवणारे आहेत. केंट येथे सप्टेंबरमध्ये पहिल्यांदा हा विषाणू सापडला होता. आता इंग्लंड व उत्तर आयर्लंडमध्ये या विषाणूचा प्रसार जास्त असून तो ५० देशांत पोहोचला आहे.  हा विषाणू जास्त पसरणारा व संसर्गजन्य असल्याचे तेव्हाच सांगण्यात आले होते, पण त्याची जोखीम पातळी तेव्हा समजली नव्हती. पण ती मूळ विषाणूपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे.

वैज्ञानिक सल्लागार गटाचे प्रमुख सर पॅट्रिक व्हॅलन्स यांनी सांगितले की, नवीन करोना विषाणूची बाधा होण्याची शक्यता व त्याची जोखीम दोन्हीही जुन्या विषाणूपेक्षा घातक आहेत. असे असले तरी माहितीत नेहमीच काही प्रमाणात अनिश्चिातता असते. साठीतील व्यक्तींचा मृत्यूू होण्याची शक्यता या विषाणूत हजारात १३ या प्रमाणात आहे. मूळ विषाणूत ती हजारात १० होती, त्यामुळे हा विषाणू ३० टक्के अधिक घातक आहे. पण ज्यांनी लस घेतली आहे त्यांना या विषाणूमुळे कुठलीही जोखीम नाही.

नव्या विषाणूचा भारतात दीडशे लोकांना संसर्ग

नवी दिल्ली : कोविड-१९ विषाणूच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेल्या भारतातील लोकांची संख्या १५० वर पोहचली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले. या सर्व लोकांना संबंधित राज्य सरकारांनी निश्चित केलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये एकाच खोलीच्या विलगीकरणात (सिंगल रूम आयसोलेशन) ठेवण्यात आले असल्याचे मंत्रालयाने यापूर्वी सांगितले होते. त्यांच्या जवळच्या संपर्कात आलेल्यांनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचे सहप्रवासी, कुटुंबातील संपर्क व इतरांना शोधून काढण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून वाढीव निरीक्षण, तपासणी आणि ‘इंडियन सार्स सीओव्ही-२ जिनोमिक्स कंसॉर्टियम’ (इनसाकॉग) प्रयोगशाळांकडे नमुने पाठवणे याबाबत राज्यांना नियमितपणे सल्ला देण्यात येत आहे.