करोनाच्या दुसऱ्या लाटेपासून ४ लाखांच्या आसपास पोहोचलेली रुग्णसंख्या आता हळूहळू खाली येताना दिसत आहे. दैनंदिन सापडणाऱ्या रुग्णांमध्ये सलग आठ दिवस घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत १ लाख ३२ हजार ३६४ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. करोना मृत्यांच्या आकडेवरीतही दरदिवशी चढउतार पाहायल मिळत आहे. गुरुवारी दिवसभरात २,७१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत १ लाख ३२ हजार ३६४ करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २,७१३ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २ लाख ७ हजार ७१ रुग्ण करोनावर मात करुन घरी परतले आहेत. सलग २२व्या दिवशी नव्या करोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. याआधी बुधवारी एक लाख ३४ हजार १५४ करोनाबाधितांची नोंद झाली होती तर २,८८७ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

गुरुवारी तामिळनाडूमध्ये सर्वाधिक २४,४०५  नवीन रुग्णांची नोंद झाली तर ४६० जणांचा मृत्यू झाला होता. तामिळनाडूमध्ये सध्या २.८० लाख अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. त्यानंतर केरळमध्ये १८,८५३ रुग्ण आढळले आहेत आणि १५३ मृत्यूची नोंद झाली आहे. कर्नाटकात १८,३२४ नवीन रुग्ण आढळले आहेत आणि ५१४  बाधितांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात १५,२२९ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि ३०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशभरात आतापर्यंत २ कोटी ८५ लाख ७४ हजार ३५० जणांना करोनाची लागण झाली आहे. २ कोटी ६५ लाख ९७ हजार ६५५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर देशात आतापर्यंत ३ लाख ४० हजार ७०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात १६ लाख ३५ हजार ९९३ सक्रिय रुग्ण आहेत. तर २२ कोटी ४१ लाख ९ हजार ४४८ जणांनी करोनावरील लस घेतली आहे.