मेघालयातील एकमेव करोना रुग्ण असलेल्या डॉक्टरचा बुधवारी  सकाळी मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबातील त्याच्या पत्नीसह सहाजणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे, असे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी म्हटले आहे.

बेथनी हॉस्पिटल्सचे संस्थापक असलेले डॉ. जॉन एल. सैलो रायनथियांग (वय ६९) असे मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव असून त्यांचे पहाटे २.४५ वाजता करोनाने त्यांचे निधन झाले. त्यांची चाचणी सोमवारी सायंकाळी सकारात्मक आली होती. मुख्यमंत्र्यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, राज्यातील पहिला करोना रुग्ण आज पहाटे २.४५ वाजता मरण पावला असून संबंधित त्यांच्या कुटुंबीयांच्या दुखात आम्ही सहभागी आहोत.

राज्यात आतापर्यंत ६८ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी सहाजणांना संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. या सहा जणांमध्ये सदर डॉक्टरच्या कुटुंबातील सदस्य व मदतनीस यांचा समावेश आहे. आणखी सहाजणांची फेरचाचणी केली जाणार आहे. बाकी अनेकांच्या चाचण्या या नकारात्मक आल्या आहेत.

शिलाँग येथे बेथनी हॉस्पिटल येथे डॉ. सैलो यांना दाखल करण्यात आले होते तो भाग व री भोई जिल्ह्य़ातील नोंगपाह गावातील याच रुग्णालयाचा दुसरा परिसर सील करण्यात आला असून तेथील सर्वाना वैद्यकीय आस्थापनांमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शिलाँग येथील या रुग्णालयाच्या परिसरास २२ मार्चपासून  दोन हजारजणांनी भेट दिली आहे.