गेल्या वर्षी मार्च महिन्यात देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्याच्याही ४ महिने आधी जगात करोनाचा पहिला रुग्ण सापडला. भारतात त्यासाठी अजून दोन महिने जावे लागले. पण करोनाचं संकट गहिरं झाल्यानंतर केंद्रसरकारने सुरुवातीपासून जे काही नियम, आवाहनं, सूचना, आदेश दिले आहेत, त्या सगळ्यांमध्ये एक बाब सातत्याने सांगितली जात आहे. ती म्हणजे मास्क वापरा, सातत्याने हात धुवा आणि शारिरिक अंतर पाळा! आज देशात असंख्य प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. करोनाचा राक्षस डोक्यावर नाचत आहे. पण असं असतानाही मास्क या अत्यंत मूलभूत सुरक्षेकडे भारतीयांनी दुर्लक्ष केल्याचंच चित्र आहे. खुद्द केंद्र सरकारनेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार तब्बल अर्धा भारत मास्कच वापरतच नाही हे स्पष्ट झालं आहे! त्यामुळे आपल्याच आरोग्याबाबत आपणच किती सतर्क आणि जबाबदार आहोत, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या एका सर्वेक्षणाच्या हवाल्याने केंद्र सरकारने इंडिया फाईट्स करोना या अधिकृत ट्विटर हँडलवर ही आकडेवारी पोस्ट केली आहे.

५० टक्के भारतीय मास्कविना असुरक्षित!

केंद्र सरकारने एका सर्वेक्षण अहवालाच्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, अर्धा भारत मास्क वापरतच नाही. अर्थात देशातली ५० टक्के जनता मास्क ही मूलभूत सुरक्षा वापरतच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य प्रशासनाकडून करोनाविरोधात सुरू असलेल्या लढ्यामध्ये मास्क वापरणं आवश्यक आणि महत्त्वाचं असल्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

 

५० टक्के मास्क घालतात, पण…!

देशातले ५० टक्के भारतीय मास्क घालतात खरे पण त्यामध्ये देखील प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तऱ्हा असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मास्क घालणाऱ्यांपैकी ६४ टक्के भारतीय मास्क तोंडावर घालतात. पण नाक उघडंच ठेवतात. त्यानंतर २० टक्के भारतीय मास्क घालतात, पण तो तोंडावर नसून हनुवटीवर घालत असल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. २ टक्के भारतीय तर मास्क हनुवटीवरही न लावता थेट गळ्यावर ठेवतात!

फक्त १४ टक्के योग्य प्रकारे मास्क घालतात!

या अहवालातील आकडेवारीनुसार, फक्त १४ टक्के भारतीय योग्य प्रकारे मास्क घालत असल्याचं स्पष्ट धालं आहे. यामध्ये मास्कद्वारे नाक, तोंड, हनुवटी झाकली गेलेली असते. नाकावर मास्कला क्लिप लावलेली असते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनासंदर्भात भारतातील योग्य ती माहिती देण्यासाठी सुरू केलेल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ही आकडेवारी पोस्ट करण्यात आली आहे. पोस्टमध्ये दावा केल्याप्रमाणे १० एप्रिल रोजीनुसार ही आकडेवारी तयार करण्यात आली असून देशभरातल्या २५ शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यापैकी नमुना पद्धतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

लस घेतली किंवा नाही, पण त्रिसूत्रीचे पालन महत्वाचे; केंद्राच्या वैज्ञानिक सल्लागारांचे मत

काय सांगते रुग्णांची आकडेवारी?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात मागील २४ तासांत म्हणजे बुधवारी दिवसभरात दोन लाख ७६ हजार ७० नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात तीन लाख ६९ हजार ७७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत ३,८७४ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशात एकूण मृतांची संख्या दोन लाख ८७ हजार १२२ वर जाऊन पोहोचली आहे. यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात ५९४ मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रात ३४ हजार ३१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.