सोलना, स्वीडन : इस्रायल हा देश कोविड लसीकरणात आघाडीवर आहे. हा देश भूमध्य सागरी प्रदेशाच्या टोकावरचा देश असून तेथून मिळणारी माहिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तेल अवीव येथील मॅकाबी हेल्थकेअर सव्‍‌र्हिसेस या संस्थेतील संशोधकांनी म्हटले आहे की, ज्या लोकांना कोविड होऊन गेला आहे त्यांच्यातील प्रतिकारशक्ती ही ज्यांना लस दिली गेली त्यांच्यापेक्षा जास्त आहे पण याचा अर्थ कोविड संसर्ग होणे चांगले असा नाही.

कोविड संसर्ग ज्यांना होऊन गेला आहे त्यांच्यातील प्रतिकारशक्ती जास्त काळ टिकते. करोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर आपली प्रतिकारशक्ती विषाणूच्या प्रथिनांना सामोरी जाते. ज्याला आपण काटेरी प्रथिन म्हणतो.  त्यामुळे शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. ज्या लोकांना कोविड होऊन गेला आहे त्यांना पुन्हा कोविड होऊ शकतो कारण ही प्रतिकारशक्ती खूप काळ टिकते असे नाही. पण असे असले तरी तुलनात्मक विचार केला तर लशीमुळे निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीपेक्षा संसर्गाने निर्माण झालेली प्रतिकारशक्ती ही जास्त असते.

नवीन पुराव्यानुसार गंभीर  व मध्यम संसर्गापासून करोना होऊन गेलेल्यांना जास्त संरक्षण मिळते. त्यातील रुग्ण लक्षणे असलेले असोत नसोत त्यांच्यात प्रतिकारशक्ती वाढलेली असते.

हे निष्कर्ष योग्य आहेत की  नाहीत याबाबत फेरआढावा घेण्यात आलेला नाही. ही या संशोधनाची एक मर्यादा म्हणावी लागेल. या माहितीचा कुणी चुकीचा अर्थ घेऊ नये. हाही एक भाग यात आहे. नैसर्गिक संसर्गाने निर्माण झालेली प्रतिकारशक्ती जास्त प्रभावी असते असा या संशोधनाचा अर्थ आहे. पण त्यात संसर्गातील धोक्यांच्या शक्यतांचा विचार केलेला नाही, कारण यात रुग्ण दगावण्याचाही धोका असतो. त्यामुळे संसर्ग होऊन गेलेल्यांनी लशी घेऊ नयेत असे नाही. या संशोधनाची आणखी एक उणिवेची बाब अशी की, त्यात लसीकरणाचा फायदा विचारात घेतलेला नाही. कारण यात लसीकरण न केलेल्या व्यक्तींचा समावेश केलेला नाही.