दिल्लीतील अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) एका वरिष्ठ निवासी डॉक्टरची कोविड-१९ ची चाचणी सकारात्मक आली असल्याचे अधिकृत सूत्रांनी गुरुवारी सांगितले.

शरीरविज्ञानशास्त्र वभागीतील या डॉक्टरला रुग्णालयाच्या नव्या खासगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले असून, त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वाचीच तपासणी करून त्यांना घरी विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जात आहे.

या डॉक्टरच्या कुटुंबियांचीही तपासणी केली जाईल आणि त्यांचे नमुने तपासण्यात येतील. याशिवाय आणखी ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

या डॉक्टरला संसर्ग कुठून झाला हे अद्याप निष्पन्न झालेले नाही, तथापि त्याने आतापर्यंत परदेशात प्रवास केलेला नाही, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारतर्फे संचालित सफदरजंग रुग्णालयातील दोन निवासी डॉक्टरांचीही कोविड-१९ ची चाचणी सकारात्मक आली आहे, त्याचप्रमाणे दिल्ली सरकारतर्फे संचालित दोन रुग्णालयांतील दोन डॉक्टरांनाही करोनाची लागण झाली आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

सफरदजंग रुग्णालयातील दोघांपैकी एक डॉक्टर करोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या

चमूचा भाग असून, कर्तव्यादरम्यान त्याला या विषाणूचा संसर्ग झाल्याचे मानले जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दुसरी महिला निवासी डॉक्टर ही जीवरसायनशास्त्र विभागातील तिसऱ्या वर्षांची पदव्युत्तर विद्यार्थी ती अलीकडेच परदेशात जाऊन आली होती, असेही त्यांनी सांगितले.