चीनमध्ये नवीन करोना विषाणूने शनिवारी ९१ बळी घेतले असून मृतांची एकूण संख्या ८१३ झाली आहे, तर एकूण ३७ हजार निश्चित रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली.

शनिवारी एकूण ९१ लोकांचा चीनमध्ये मृत्यू झाला. दिवसभरात २६५६ नवीन रुग्ण निश्चित झाले आहेत. एकूण ३१ प्रांतात ३७,१९८ इतके निश्चित रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. शनिवारच्या ८९ मृत्यूंपैकी ८१ हुबेई प्रांतात झाले असून तेच करोनाचे मूळ केंद्र आहे. हेनानमध्ये दोन, हेबेइ, हेलाँगजियांग, अनहुई, शांगडाँग, हुनान, ग्वाग्झी झुआंग येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. शनिवारी ६०० रुग्ण बरे झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. हुबेई प्रांतात ३२४ जणांना उपचारांनंतर बरे झाल्याने घरी पाठवण्यात आले.

हुबेईत एकूण २७,१०० निश्चित रुग्ण असून त्यातील ५२४७ गंभीर आहेत. संपूर्ण चीनमध्ये २८,९४२ संशयित रुग्ण असून ६१८८ रुग्ण हे गंभीर स्थितीत आहेत. शनिवारी हाँगकाँगमध्ये २६ निश्चित रुग्ण सापडले असून हाँगकाँगमध्ये एकाचा मृत्यू झाला. मकावमध्ये १० तर तैवानमध्ये १७ निश्चित रुग्ण आहेत. मकावमधून एक व तैवानमधून एका रुग्णाला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. शनिवारी एक अमेरिकी महिला व जपानी पुरुष हे चीनमधील नवीन करोना विषाणूने मरण पावले. वुहान येथे ६१ वर्षांच्या अमेरिकी नागरिकाचा मृत्यू झाला. परदेशातून चीनमध्ये आलेल्या १९ परदेशी नागरिकांना करोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यांच्यापैकी दोघांना उपचारानंतर सोडण्यात आले. एका जपानी नागरिकाचा वुहान येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला.

भारताची चीनला मदतीची तयारी: करोना सामना करण्यासाठी चीनला मदत करण्याची भारताची तयारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना कळवले आहे. क्षी यांना लिहिलेल्या एका पत्रात मोदी यांनी  सध्याच्या कठीण परिस्थितीत आपण चीनचे अध्यक्ष आणि चिनी जनतेसोबत असल्याचे म्हटले आहे.

रेडी बंदरावरील चिनी नागरिकांना संसर्ग नसल्याचे निष्पन्न

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील रेडी बंदरावर सिंगापूर येथून आलेल्या मालवाहू जहाजावर असलेल्या १० चिनी व्यक्तींनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी चीन सोडले आहे. जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी मुंबई पोर्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली असून त्यापैकी कोणालाही कसलीही लक्षणे नसल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत राज्यात ३६ पैकी ३१ जणांना संसर्ग नसल्याने घरी सोडण्यात आले आहे. उरलेल्या पाच जणांचे अहवाल उद्यापर्यंत येतील. शनिवारी संध्याकाळी एका प्रवाशाला सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळल्याने पुणे येथील नायडू रुग्णालयात दाखल केले. जिल्हा रुग्णालय, जळगाव येथे निरीक्षणाखाली असलेला प्रवासीही करोनाबाधित नसल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयात दाखल असलेल्या सहा जणांपैकी प्रत्येकी दोन जण मुंबई येथील कस्तुरबा आणि पुणे येथील नायडू रुग्णालयात आहेत. प्रत्येकी एक जण नवी मुंबई आणि सांगली येथे दाखल आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.मुंबई  विमानतळावर २१ हजार २०३ प्रवासी तपासण्यात आले आहेत.