जगातील विविध भागांमध्ये गेल्या वर्षीच करोनाचा उद्रेक झाला, मात्र केवळ चीननेच त्याबाबत माहिती दिली आणि त्यानुसार सर्वप्रथम पावले उचलली, असा दावा चीनने शुक्रवारी केला. या साथीचे मूळ वुहानमध्ये असल्याचा आरोपही चीनने ठामपणे फेटाळला आहे.

कोविड-१९चा फैलाव वुहानमधील जैव-प्रयोगशाळेतून झाल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. तो अमान्य करतानाच, वटवाघूळ किंवा खवले मांजरांमार्फत माणसात करोना उत्पन्न झाल्याची बाबही चीनने फेटाळून लावली.

करोना विषाणू हा नव्या प्रकारचा विषाणू आहे हे नव्या अहवालातून स्पष्ट होत आहे, जगातील विविध भागांमध्ये गेल्या वर्षअखेरीला करोनाचा उद्रेक झाला याची आपल्याला कल्पना आहे, चीननेच त्याची जगाला माहिती दिली, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनिंग यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना हा सत्तारूढ पक्ष करोनावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी टोकियोमध्ये क्वाड मंत्र्यांच्या बैठकीत केला. त्या पार्श्वभूमीवर चुनिंग यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे.