करोना दुसऱ्या लाटेत गोव्यातील आरोग्य यंत्रणेची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच ऑक्सिजन अभावी करोना रुग्णांचा मृत्यू होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला धारेवर धरलं आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये रुग्णांचा मृत्यूच्या घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. गेल्या ४ दिवसात या रुग्णालयात ७४ रुग्णांनी जीव गमावला आहे. मंगळवारी २६, बुधवारी २०, गुरुवारी १५ आणि शुक्रवारी १३ रुग्णांची जीव गेला आहे. ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.

राज्य सरकारने ऑक्सिजन पुरवठ्यावरुन सुरु असलेल्या या गोंधळाप्रकरणी समिती नेमली आहे. तीन सदस्यीय समिती चौकशी करणार असून तीन दिवसांत अहवाल सादर केला जाणार आहे.

भारतात देण्यात आला ‘स्पुटनिक व्ही’चा पहिला डोस; जाणून घ्या एका डोसची किंमत किती?

गोव्यात गेल्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशात सर्वाधिक पॉझिटीव्हिटी रेट हा गोव्यात आहे. गुरुवारी रुग्ण वाढीचा दर ४८.१ टक्के इतका होता. गेल्या २४ तासात गोव्यात २ हजार ४९१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.