News Flash

करोनाच्या रुग्ण दुपटीच्या वेगात वाढ

लाल, केशरी व हिरव्या श्रेणींमध्ये जिल्ह्य़ांची विभागणी केली असून राज्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही यादी अद्ययावत केली जाणार आहे

(संग्रहित छायाचित्र)

करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग पुन्हा वाढला असून तो १२ दिवसांवरून आता १० दिवसांवर आला आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तमिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये केंद्राची पथके सातत्याने पाहणी करत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी शुक्रवारी दिली.

केंद्राने अगरवाल यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पथक पाठवले होते. राज्य सरकारकडून माहिती घेण्यात आली असून पुढील दोन दिवसांत देशभरातील करोनाबाधित श्रेणींची नवी यादी जाहीर केली जाणार आहे. लाल, केशरी व हिरव्या श्रेणींमध्ये जिल्ह्य़ांची विभागणी केली असून राज्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही यादी अद्ययावत केली जाणार आहे, असे अगरवाल म्हणाले. पहिली यादी ३० एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

करोनाच्या प्रादुर्भावाचे जून-जुलैमध्ये शिखर गाठले जाऊ शकते या प्रश्नावर अगरवाल म्हणाले की, रुग्ण वाढण्याचा वेग किती नियंत्रित केला जातो यावर ते अवलंबून असेल. विविध बदलत्या घटकांच्या आधारे अंदाज बांधला जात असल्याने शिखर गाठले तर रुग्णांची संख्या काही हजार वा काही कोटी असू शकेल असे सांगितले जाते. मुंबईसारख्या अधिक बाधित शहरांमध्ये रुग्ण किती नियंत्रित करता येईल, यावर भर दिला पाहिजे. रक्तद्रव्य उपचार पद्धतीची चाचणी घेण्यास २१ रुग्णालयांना भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने परवानगी दिल्याचेही अगरवाल यांनी सांगितले.

२२२ रेल्वेतून अडीच लाख रवाना

टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही केला जात आहे. त्याअंतर्गत मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू, पर्यटक आदींना गावी पोहोचवण्यासाठी बस व रेल्वेंना अनुमती देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत रेल्वे मंत्रालयाने २२२ विशेष रेल्वे सोडल्या असून अडीच लाखांहून अधिक लोकांच्या प्रवासाची व्यवस्था केली आहे, अशी महिती केंद्रीय गृह संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी शुक्रवारी दिली.

२१५ रेल्वे स्थानकांमध्ये ५२३१ विशेष डबे

२३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण २१५ रेल्वे स्थानकांमध्ये करोना रुग्णांच्या उपचारासाठी ५२३१ विशेष डब्यांची व्यवस्था केली जाणार असून प्रत्येक केबिनमध्ये किमान दोन रुग्णांना ठेवता येईल. ८५ स्थानकांतील डब्यांमध्ये रेल्वे मंत्रालयाकडून आरोग्यसेवा कर्मचारी पुरवले जातील व १३० स्थानकांमध्ये ही व्यवस्था राज्य सरकारे करतील.

३,३९० नवे रुग्ण

गेल्या चोवीस तासांमध्ये ३,३९० नव्या करोना रुग्णांची भर पडली आहे. देशात एकूण करोना रुग्णांची संख्या ५६,३४२ झाली असून १,८८६ मृत्यू झाले आहेत. १६,५३९ रुग्ण बरे झाले आहेत. रुण बरे होण्याचे प्रमाण २९.३३ टक्के इतके झाले आहे. रुग्णालयातील रुग्णांपैकी ४.७ टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. ३.२ टक्के रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. १.१ टक्के रुग्णांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. देशातील २१६ जिल्हे करोनामुक्त असून ५२ जिल्ह्य़ांमध्ये २८ दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. २७ जिल्ह्य़ांमध्ये २१ दिवस तर, ३७ जिल्ह्य़ांमध्ये १४ दिवसांमध्ये, ६९ जिल्ह्य़ांमध्ये गेल्या सात दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती अगरवाल यांनी दिली.

रेस्ताराँ, बाजारपेठांबाबत निर्णय नाही!

टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आर्थिक व्यवहार सुरू करण्यासाठी काही सवलती देण्यात आल्या आहेत. टाळेबंदीचा कालावधी १७ मे रोजी संपत आला असला तरी रेस्ताराँ, बाजारपेठा सुरू करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती श्रीवास्तव यांनी दिली.

विदेशातून आल्यावर विलगीकरण स्वखर्चानेच!

देशांतर्गत लोकांच्या प्रवासाची सोय केल्यानंतर आता केंद्र सरकार विदेशात अडकलेल्या नागरिकांनाही टप्प्याटप्प्याने भारतात आणणार आहे. बिगर व्यावसायिक विमानसेवा तसेच नौदलाच्या जहाजांच्या मदतीने या नागरिकांना परत आणले जात आहे. विदेशात अडकलेल्या नागरिकांनी भारतीय दूतावास व उच्चायुक्त कार्यालयात नोंदणी करावी. करोनाची लक्षणे नसलेल्या नागरिकांनाच विमान प्रवासाची अनुमती देण्यात येणार आहे. देशात परत आल्यानंतर प्रत्येक नागरिकाने स्वखर्चाने १४ दिवस संस्थात्मक विलगीकरण करणे सक्तीचे करण्यात आले असल्याचेही श्रीवास्तव यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 12:05 am

Web Title: corona patient doubled in speed abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘दुसऱ्यांदा वायुगळती झाल्याच्या बातम्या चुकीच्या’
2 पंतप्रधानांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवावा!
3 आपल्याला करोनाशी जुळवून जगणं शिकलं पाहिजे – लव अग्रवाल
Just Now!
X