केरळमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांना संसर्ग

केरळमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांना करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून देशातील रुग्णांची संख्या आता ३९ झाली आहे. या कुटुंबातील तिघांनी अलीकडेच इटलीला भेट दिली होती.

केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा  यांनी या रुग्णांविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या, रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, पण जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. या कुटुंबातील लोकांनी विमानतळावर ते कोणत्या देशात जाऊन आले हे सांगितले नव्हते आणि त्यांची चाचणीही करण्यात आली नव्हती. इतकेच नव्हे तर त्यांनी सुरुवातीला रुग्णालयात दाखल होण्यासही नकार दिला होता, पण आम्ही त्यांचे मन वळवून रुग्णालयात नेले.

हे पाचही जण पाथनमथिट्टा जिल्ह्य़ातील असून त्यात एक पन्नाशीतील जोडपे आणि त्यांचा २६ वर्षांचा मुलगा यांचा समावेश आहे, असेही शैलजा यांनी सांगितले. ते सर्व जण १ मार्चला इटलीतून भारतात आले. संसर्ग झालेले इतर दोन जण त्यांचे नातेवाईक आहेत. त्यांच्या चाचण्या सकारात्मक आल्या आहेत. पाचही जणांना पाथनमथिट्टा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही शैलजा यांनी सांगितले.

परदेशातून आल्यावर या कुटुंबांतील काहींनी नातेवाईकांची भेट घेतली होती. त्यांच्या नातेवाईकांनी लक्षणे आढळल्यानंतर रुग्णालयात धाव घेतली होती. त्यांच्या दोन नातेवाईकांच्या चाचण्या सकारात्मक आल्या होत्या. इटलीत जाऊन आलेल्या कुटुंबालाही नंतर स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे, त्याचबरोबर या कुटुंबातील वयोवृद्ध दाम्पत्यालाही कोट्टायम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असेही शैलजा यांनी स्पष्ट केले. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे, असेही त्या म्हणाल्या.

हे कुटुंब व्हेनिस, दोहा येथे जाऊन नंतर कोचीला परतले होते. ते १ मार्चला कोचीत आले होते. ६ मार्चला या कुटुंबातील पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या चाचण्या सकारात्मक असल्याचे शनिवारी रात्री स्पष्ट झाले. केरळच्या आरोग्यमंत्री शैलजा म्हणाल्या की, इटलीहून आलेल्या कुटुंबाने त्यांचा प्रवास इतिहास लपवला. खरे तर हा गुन्हाच समजायला हवा. इराण, इटली, दक्षिण कोरिया आणि चीनमधून आलेल्या लोकांनी आरोग्य विभागाला कल्पना देणे आवश्यक आहे.

इराण : २४ तासांत ४९ बळी   इराणमध्ये एका दिवसात ४९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे तेथील आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले. करोनाचा फैलाव झाल्यापासून २४ तासांच्या आत एवढय़ा मोठय़ा संख्येने रुग्ण दगावण्याची ही पहिलीच घटना आहे. इराणमधील बळींची संख्या आता १९४ झाली आहे. या विषाणूचा फैलाव इराणच्या ३१ प्रांतांमध्ये झाला असून ६५६६ लोकांना संसर्ग झाला आहे.

इटलीत संचार र्निबध

रोम : करोना विषाणू पसरत असल्याने इटलीत एक कोटी ६० लाख संशयित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. देशातील एक चतुर्थाश लोकांसाठी एक आदेश जारी करण्यात आला आहे. त्यात त्यांना ते आहेत तेथेच थांबण्यास सांगण्यात आले आहे. त्यांनी त्यांच्या भागात  फिरू नयेच, पण तेथून दुसऱ्या गावी किंवा राज्यात, परदेशात जाऊ नये असे आदेशात म्हटले आहे. मध्यरात्रीनंतर पंतप्रधानांनी उत्तर इटलीच्या एका लब्धप्रतिष्ठितांच्या भागात संचारबंदी लागू करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली.