सलग तिसऱ्या दिवशी नव्या बाधितांची संख्या १० हजारांनजीक; जगात भारत आता पाचव्या स्थानी

अर्थगाडे रुळावर आणण्यासाठी येत्या काही दिवसांत हळूहळू टाळेबंदी अधिक शिथिल करण्यात येणार असली, तरी करोना रुग्णसंख्येचा वाढता दर दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालला आहे. देशात गेल्या चोवीस तासांमध्ये ९,८८७ नवे रुग्ण आढळले असून शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी रुग्णवाढ नऊ हजारांहून अधिक झाली.

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या जागतिक आकडेवारीनुसार देशातील एकूण रुग्णांची संख्या २ लाख ४५ हजार ६७० इतकी झाली असून भारत हा आता जगातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या क्रमवारीत स्पेनला मागे टाकत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. स्पेनमधील रुग्णसंख्या २ लाख ४१ हजार ३१० आहे. युरोपातील देशांपैकी इटली आणि स्पेन हे देश सर्वाधिक प्रभावित झाले होते. या क्रमवारीत आठवडय़ाभरापूर्वी भारत नवव्या स्थानावर होता. करोनाचे उगमस्थान असलेल्या चीनच्या रुग्णसंख्येपेक्षाही भारतातील रुग्णसंख्या अधिक आहे.

सध्या १ लाख १५ हजार ९४२ रुग्णांवर उपचार केले जात असून १ लाख १४ हजार ७२ रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, बरे होण्याचे प्रमाण किंचित कमी झाले आहे. ते ४८.२७   टक्क्यांवरून ४८.२० टक्क्यांवर आले आहे.  गेल्या चोवीस तासांमध्ये २९४ रुग्णांचा मृत्यू झाला. देशभरात एकूण ६,६४२ मृत्यू झाले आहेत. टाळेबंदीच्या पाचव्या टप्प्यामध्ये सोमवारपासून बहुतांश व्यवहार सुरू होत असून करोनाच्या रुग्णांत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये ९ ते १० हजार रुग्ण प्रतिदिन वाढले. मात्र गेल्या दोन महिन्यांमध्ये प्रतिदिन रुग्णवाढ ४ ते ५ हजारांच्या घरात राहिली होती.

राज्यांची स्थिती..

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या (८० हजार २२९) व मृत्यू (२,८४९) सर्वाधिक आहे. त्यानंतर, रुग्णसंख्येमध्ये तमिळनाडू (२८ हजार ६९४), दिल्ली ( २६ हजार ३३४) आणि गुजरात (१९ हजार ९४) या राज्यांचा क्रमांक लागतो. राजस्थान आणि उत्तर प्रदेशने रुग्णसंख्येमध्ये १० हजारांचा आकडा गाठला आहे. मध्य प्रदेशही

९ हजारांच्या नजीक पोहोचला आहे. आसाम आणि केरळमध्येही रुग्ण वाढू लागले आहेत. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक मृत्यू गुजरात (१,१९०) व दिल्ली (७०८) या दोन राज्यांमध्ये झाले आहेत.

सर्वात बाधित देश

अमेरिका : १९ लाख ६ हजार

ब्राझील : ६ लाख १५ हजार

रशिया : ४ लाख ५८ हजार

ब्रिटन : २ लाख ८६ हजार

भारत : २ लाख ४५ हजार

स्पेन : २ लाख ४१ हजार

संसर्ग विस्फोटाचा धोका कायम

संयुक्त राष्ट्रे : भारतात आतापर्यंत करोना संसर्गाचा विस्फोट झाला नसला तरी तो होण्याची जोखीम कायम आहे. कारण टाळेबंदी उठवण्यात आल्यानंतर रुग्णांची संख्या वाढू शकते, असे जागतिकआरोग्य संघटनेने म्हटले आहे. करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग भारतात आता तीन आठवडे आहे. याचा अर्थ ही वाढ घातांकी नसली तरी ती कमी झालेली नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले.

भारत आणि चीन यासारख्या मोठय़ा लोकसंख्येच्या देशांनी जर कोविड १९ चाचण्या वाढवल्या तर त्यांना त्यांच्याकडील करोना रुग्णसंख्या अमेरिकेपेक्षा जास्त असल्याचे  दिसेल. भारत व चीन यांनी कमी चाचण्या केल्याने तेथे रुग्णांची संख्या कमी आहे.

– डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष