व्यापक लसीकरण मोहीम, चाचण्यांचं वाढतं प्रमाण, रेमडेसिविर-ऑक्सिजनची मदत हे सगळं असलं, तरी देशात करोना दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करू लागला आहे. मृतांच्या संख्येत होणारी भितीदायक वाढ करोनाचं भीषण रूप आपल्यासमोर उभं करते आहे. उपचारांपासून अंत्यसंस्कारांपर्यंत सगळ्याच गोष्टींची कमतरता देशाच्या अनेक भागांमध्ये जाणवू लागली आहे. हरयाणामधल्या गुरुग्राममध्ये करोनानं अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण केली आहे. करोनामुळे होणाऱ्या मृतांना स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी आता रुग्णवाहिका देखील मिळेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना आपल्या आप्तजनांचे मृतदेह रिक्षा, कार अशा मिळेल त्या वाहनाने स्मशानभूमीपर्यंत नेण्याची दुर्दैवी वेळ ओढवली आहे.

अंत्यसंस्कारांसाठी स्मशानभूमीबाहेर प्रतीक्षा

गेल्या काही दिवसांपासून गुरुग्राममध्ये करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. आत्तापर्यंत गुरुग्राममध्ये १ लाख ३ हजार २८४ करोनाबाधित सापडले असून ४२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात मृतांना स्मशानभूमीपर्यंत नेण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एका अॅम्ब्युलन्ससाठी ४ तास प्रतिक्षा करावी लागत असल्याचं इथे दिसत आहे. त्यामुळे अखेर मृतांच्या नातेवाईकांनी मिळेल त्या वाहनाने मृतदेह स्मशानभूमीत नेण्याचा मार्ग स्वीकारला आहे. स्मशानभूमीच्या बाहेर मृतदेह घेऊन आलेल्या रिक्षा, कार आणि इतर खासगी गाड्यांची रांग लागलेली दिसून येत आहे. शहातल्या रामबाग स्मशानभूमीबाहेर अंत्यसंस्कारांसाठी मृतदेह तासनतास ताटकळत राहिल्याचं चित्र दिसत आहे.

Coronavirus: “बालाजीची प्रार्थना करा, देवाला नारळ चढवा”; केंद्रीय मंत्र्याचा रुग्णांच्या नातेवाईकांना अजब सल्ला

रुग्णवाहिका चालकांकडून लूट

या सगळ्या कोलाहलात रुग्णवाहिका मिळालीच, तरी अशा काळात माणुसकी न दाखवता अनेक रुग्णवाहिका चालक अव्वाच्या सव्वा दर आकारू लागले आहेत. किमान ५ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत मागणी चालकांकडून केली जात आहे. यासाठी प्रशासनाने दिलेले हेल्पलाईन नंबर देखील काम करत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी नुकतीच रुग्णवाहिका म्हणून वापर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात २० गाड्या पुरवण्याची घोषणा केली आहे. मात्र, संपूर्ण जिल्ह्यासाठी २० गाड्या पुरतील का? असा प्रश्न देखील स्थानिकांकडून विचारला जात आहे.