कोविड-१९ संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तब्बल वर्षभराचा कालावधी उलटून गेल्यानंतरही अनेकांना थकवा आणि श्वास घेताना त्रास होण्याच्या समस्या उद्भवत असल्याचं चीनमधील एका अभ्यासानुसार सांगण्यात आलं आहे. म्हणूनच, करोनाच्या महामारीमुळे आरोग्यावर होणाऱ्या या दीर्घकालीन परिणामांना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

शुक्रवारी प्रकाशित झालेल्या ब्रिटिश मेडिकल जर्नल द लॅन्सेट अभ्यासात असं म्हटलं गेलं आहे कि, “करोनासाठी रुग्णालयात दाखल झालेले आणि त्यानंतर बरं होऊन घरी सोडण्यात आलेल्या एकूण रुग्णांपैकी सुमारे निम्मे रुग्ण हे १२ महिन्यांनंतर देखील कमीतकमी एका तरी लक्षणाने ग्रस्त असल्याचं दिसून आलं आहे. बहुतेकदा हे लक्षण थकवा किंवा स्नायू कमकुवत होणं यापैकी काहीतरी असतं.”

‘लाँग कोविड’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संज्ञेशी किंवा आरोग्यविषयक स्थितीशी संबंधित असलेल्या या सर्वात मोठ्या संशोधनात असं म्हटलं गेलं आहे की, दर तीन रुग्णांपैकी एकाला करोना निदानानंतर तब्बल वर्षभरानंतरही श्वास घेण्यास त्रास जाणवत आहे.

वुहानमधील १,३०० लोकांचा पाठपुरावा

अभ्यासानुसार जानेवारी ते मे २०२० दरम्यान चीनच्या वुहान शहरात कोविड१९साठी रुग्णालयात दाखल झालेल्या सुमारे १,३०० लोकांचा पाठपुरावा करण्यात आला. कमीत कमी एक लक्षण असलेल्या रुग्णांचा वाटा हा सहा महिन्यांनंतर ६८ टक्क्यांवरून कमी होऊन १२ महिन्यांनंतर ४९ टक्क्यांवर इतका झाला. तर श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांनाच वाटा हा सहा महिन्यांनंतर २६ टक्के रुग्णांपासून वाढून १२ महिन्यांनंतर ३० टक्के इतका झाला आहे.

स्त्रियांचं प्रमाण पुरुषांपेक्षा ४३ टक्के अधिक

अभ्यासात असं आढळून आलं आहे की, करोनानंतर थकवा किंवा स्नायूंच्या सतत कमकुवतपणाची समस्या जाणवणाऱ्यांमध्ये तुलनेने स्त्रियांचं प्रमाण पुरुषांपेक्षा ४३ टक्के अधिक आहे. तर चिंता किंवा नैराश्याचं निदान होण्याची शक्यता दुप्पट आहे. या अभ्यासात जुन्या संशोधनाचा सुद्धा दाखल देण्यात आला आहे. ज्यात विविध देशांतील अधिकाऱ्यांना इशारा दिला होता कि, त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि करोनाबाधित रुग्णांना दीर्घकालीन सहाय्य देण्यासाठी तयार असलं पाहिजे.

“लॉंग कोव्हीड हे मॉडर्न मेडिकलपुढील सर्वात पहिलं आव्हान आहे,” असंही या संपादकीयात म्हटलं गेलं आहे. त्याचप्रमाणे, लॉंग कोव्हीडची ही स्थिती समजून घेण्यासाठी आणि ग्रस्त रुग्णांची चांगली काळजी घेण्यासाठी अधिक संशोधनाची गरज असल्याचं देखील म्हणण्यात आलं आहे.