चीनमधील करोना विषाणूने निर्माण झालेली परिस्थिती गंभीर असली तरी अजून ती जागतिक साथ जाहीर करता येणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. प्रत्यक्षात अमेरिकेसह ५७ देशांमध्ये करोनाचा प्रसार झाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे, की करोनाची जागतिक साथ जाहीर करण्यास आम्ही अजून अनुकूल नाही कारण  सीओव्हीआयडी १९ या विषाणूची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेने विषाणूचे जोखीम मूल्यमापन करून परिस्थितीचे वर्णन धोकादायक ऐवजी आता अतिधोकादायक असे  केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक मायकेल रायन यांनी सांगितले, की जागतिक साथ ही तेव्हाच जाहीर केली जाते जेव्हा जगातील सर्वच लोक विशिष्ट काळात विषाणूला सामोरे गेलेले असतात. सीओव्हीआयडीच्या बाबतीत परिस्थिती तशी नाही. त्यात अनेक उपाययोजना करण्यात आल्या असल्याने अनेक ठिकाणी त्याची परिस्थिती वेगळी आहे.

दरम्यान, चीनमध्ये करोना विषाणूने शुक्रवारी ४७ जण मरण पावले. मृतांची संख्या  २,८३५ झाली आहे.