संशोधनातील निष्कर्ष

सर्दीच्या विषाणूचा प्रादुर्भाव नेहमी होणाऱ्या व्यक्तींमध्ये करोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता खूपच कमी असते, असे एका संशोधनात दिसून आले. सार्स सीओव्ही २ विषाणू ज्या व्यक्तींमध्ये आधीपासून सर्दी असते त्यांच्यात संसर्ग करू शकत नाही.

‘जर्नल एक्सपिरिमेंटल मेडिसीन’ या नियतकालिकात म्हटले आहे की, सर्दीचा ऱ्हायनोव्हायरस विषाणू हा श्वासन मार्गात नेहमी आढळून येत असतो. या विषाणूचा संसर्ग आधीच झालेला असेल, तर शरीरातील जनुकांना ‘इंटरफेरॉन’ क्रिया सुरू करण्याची सवय लागलेली असते. ही जनुके प्रतिकारशक्ती प्रणालीतील इंटरफेरॉन रेणूंना सार्स सीओव्ही २ वाढीविरोधात क्रिया सुरू करण्यास प्रेरणा देतात. त्यामुळे श्वासनमार्गात नेहमी संसर्ग करणारे सर्दीचे विषाणू ज्यांच्यात असतात त्यांच्यात सार्स सीओव्ही २ म्हणजे कोविड विषाणू बाधा करू शकत नाही.

करोना विषाणूचा शरीरात प्रवेश होताच ही जनुके इंटरफेरॉन्स रेणूंचा मारा करतात व तेथेच करोनाच्या विषाणूला थोपवले जाते, असे मत अमेरिकेतील येल स्कूल ऑफ मेडिसीन या संस्थेचे सहायक प्राध्यापक एलेन फॉक्समन यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, रुग्णांवर प्रतिकारशक्ती प्रणालीमध्ये आढळणाऱ्या इंटरफेरॉन या प्रथिन रेणूंच्या मदतीने उपचार करता येतात. तशी औषधे उपलब्धही आहेत पण ती नेमकी कुठल्या वेळी वापरायची हे कळत नाही. आधीच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, करोनाच्या नंतरच्या टप्प्यांमध्ये इंटरफेरॉन्सची पातळी वाढली तरी रोगाची गंभीरता वाढत जाते त्यामुळे प्रतिकार शक्तीची अतिरिक्त प्रतिक्रिया उमटून वेगळे परिणाम होऊ शकतात.

फॉक्समन यांनी म्हटले आहे की, अलिकडच्या जनुकीय अभ्यासानुसार इंटरफेरॉन्सचा वापर करोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच शक्य असतो. त्यात करोना विषाणूला थोपवण्याची क्षमता असते. ज्यांना नेहमी सर्दी होते, त्यांच्यात इंटरफेरॉनच्या मदतीने नैसर्गिक व वेळेवरचा प्रतिकार नेहमीच होत असतो. त्यांना कुठली औषधे द्यावी लागत नाहीत तरी त्यांचे सर्दीचे विषाणू मारले जातात, तशीच क्रिया करोना विषाणूच्या बाबतीतही घडते.

मानवी श्वसनमार्गातील पेशी प्रयोगशाळेत वाढवून त्यावर केलेल्या प्रयोगात असे आढळून आले की, पहिल्या तीन दिवसांत विषाणूंची उतींमधील संख्या दर सहा तासाला दुप्पट होते. ऱ्हाइनोव्हायरसची बाधा असलेल्या उतींमध्ये करोनाचा प्रादुर्भाव होत नाही.