देशात करोनाची लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. एका वेळी चार लाखांपर्यंत आढळून येणारी रुग्णसंख्या ही आता ३० ते ४० हजारांवर आली आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन काढून अनलॉक करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पूर्णपणे निर्बंध उठवले गेले नसले तरी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. मात्र केंद्राने पॉझिटिव्ही रेट जास्त असलेल्या जिल्ह्यांत कडक पावलं उचलण्याचे निर्देश आता दिले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने कोविड -१९ मार्गदर्शक तत्वे ३१ ऑगस्टपर्यंत लागू करण्याच्या सूचना दिली आहे. तसेच राज्यांना पॉझिटिव्ह रुग्णाचे प्रमाण जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये “कठोर उपाययोजना” करण्यास सांगितले आहे.

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. कोविड -१९ प्रकरणांमध्ये घट होत असली तरी करोनाच्या प्रोटोकॉलचे नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

सामान्यत: ‘आर’ घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विषाणूची पुनरुत्पादन संख्या ‘एक’ च्या खाली घसरत आहे पण काही राज्यात ती जास्त आहे. पुनरुत्पादन घटकात कोणतीही वाढ होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत. तरीही ज्या जिल्ह्यांमध्ये अजूनही पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत त्यासाठ कठोर उपाययोजना कराव्यात,” असे भल्ला यांनी सर्व राज्य मुख्य सचिव आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, देशात मंगळवारी पुन्हा ४० हजाराच्यावर रुग्णसंख्या आढळली आहे. देशात सोमवारच्या तुलनेत ४७ टक्के रुग्णवाढ झाली आहे. गेल्या तीन आठवड्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ४३ हजार ६५४ नवीन करोना रुग्ण आढळले. तर ६४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

त्याचबरोबर, गेल्या २४ तासात ४१ हजार ६७८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या देशात ३ लाख ९९ हजार ४३६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत देशात ३ कोटी ६ लाख ६३ हजार १४७ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर ४ लाख २२ हजार २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.