महाराष्ट्रात करोनाच्या वेगाने होणाऱ्या दैनंदिन रुग्णवाढीबाबत गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली. राज्यातील परिस्थिती गंभीर बनू लागली असून तातडीने नमुना चाचण्या वाढवण्याची गरज आहे. करोनाचे संकट टळलेले नसून कोणताही निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो, हे महाराष्ट्रातील स्थितीवरून स्पष्ट होते. त्यामुळे अन्य राज्यांनीही दक्ष राहावे, असा इशारा निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी दिला.

करोनासंदर्भातील दक्षता घेण्याकडे कळत-नकळत दुर्लक्ष झाल्याने महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण पुन्हा वेगाने वाढत आहेत. मात्र, उत्परिवर्तित विषाणूमुळे राज्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढला नसल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी स्पष्ट केले. राज्यात सर्वांसाठी सुरू झालेल्या लोकल रेल्वे, लग्नसराईचे दिवस आणि करोनाचे नियम पाळण्याबाबत लोकांचा निष्काळजीपणा या कारणांमुळे महाराष्ट्रात रुग्णवाढ झालेली असल्याचे निरीक्षणही भार्गव यांनी नोंदवले.

महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णवाढ इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असली तरी, मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात या तीन राज्यांमध्येही झपाट्याने रुग्णवाढ होण्याची भीती पॉल यांनी व्यक्त केली. दिल्ली सरकारनेही सावध राहण्याची गरज आहे. या राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी तीन बैठका झाल्या असून प्रतिबंधात्मक उपायांकडे कोणत्याही स्थितीत दुर्लक्ष होऊ  देऊ नका, असे सक्त आदेश केंद्राने दिले आहेत. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये महाराष्ट्रासारखी झपाट्याने रुग्णवाढ होत होती, मात्र आता तेथील परिस्थिती नियंत्रणात आणली जात आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्येही उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी करण्यात यश आले असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये गेल्या महिन्याभरात (११ फेब्रुवारी ते १० मार्च) करोनाचे दैनंदिन रुग्ण वाढत गेले आहेत. करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथके पाठवली जात आहेत, तसेच, राज्यांच्या यंत्रणांना पुन्हा कार्यतत्पर बनवण्याचेही प्रयत्न केले जात आहेत. त्यासह लसीकरणाचा वेग वाढण्यावर केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले असून लसनिर्मितीही वाढवली जाणार आहे. लसी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून कुठल्याही राज्यात लसींचा तुटवडा नाही. राज्यांना मागणीनुसार लस पुरवली जाईल, अशी माहिती पॉल यांनी दिली.

आयुष्मान भारत, केंद्रीय आरोग्य योजना (सीजीएचएस) आणि राज्यांची आरोग्य योजना या तीन योजनांत समाविष्ट सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केले जात असून महाराष्ट्र, ओडिशा या राज्यांमध्ये अतिरिक्त लसीकरण केंद्रांनाही परवानगी देण्यात आली आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी अधिकाधिक खासगी रुग्णालयांनी सहभागी होण्याचेही आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे.

तिसऱ्या टप्प्याबाबत मौन

खासगी रुग्णालयांना आठवड्यांचे सर्व दिवस चोवीस तास लसीकरण केंद्र सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली असून सरकारी रुग्णालयांत आठवड्यात किमान चार दिवस लसीकरण सुविधा उपलब्ध असेल, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. लसीकरणाची व्याप्ती वाढवली जाणार असल्याने दुसऱ्या टप्प्यात अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे भूषण यांनी सांगितले. आत्ता ६० पेक्षा जास्त व सहव्याधी असलेल्या ४५ पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण केले जात असला तरी उर्वरित वयोगटासाठी तिसरा टप्पा कधी सुरू होणार याबाबत भूषण यांनी मौन बाळगले.

८५.९१ टक्के नवे बाधित सहा राज्यांमधील

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, पंजाब, तमिळनाडू आणि गुजरातमध्ये करोनाची नव्याने लागण होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे.

देशात गेल्या २४ तासांत करोनाची नव्याने लागण झाली त्यामध्ये या सहा राज्यांमधील बाधितांचे प्रमाण ८५.९१ टक्के इतके आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीन गुरुवारी सांगण्यात आले. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १३ हजार ६५९ जणांना (६० टक्के) करोनाची लागण झाली. त्यापाठोपाठ केरळ (२४७५) अणि पंजाबचा (१३९३) क्रमांक आहे.

देशात आतापर्यंत २.५६ कोटींहून अधिक जणांना लस देण्यात आली आहे.

देशात २२ हजार ८५४ जणांना लागण

देशात गेल्या एका दिवसात आणखी २२ हजार ८५४ जणांना करोनाची लागण झाली असून हा या वर्षातील उच्चांक आहे. देशात सध्या एकूण एक कोटी १२ लाख ८५ हजार ५६१ करोनाबाधित आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी सांगण्यात आले.