करोनाचा पहिला रुग्ण चीनच्या वुहानमध्ये आढळला होता. त्यानंतर या विषाणून संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतलं. असं असताना गेल्या काही दिवसात चीनमध्ये करोना रुग्णसंख्या कमी झाली होती. चीनमध्ये पुन्हा एकदा करोनानं डोकं वर काढलं आहे. चीनच्या दक्षिणपूर्व फुजियान भागात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे पुतियान शहरातील चित्रपटगृह, जीम, महामार्ग बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर रहिवाशांना शहर न सोडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. करोनाचा उद्रेक पाहता सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

फुजियानमधील पुतियान शहरात करोना रुग्ण संख्या वाढत आहे. यासाठी चीन आरोग्य विभागाने या ठिकाणी तपासणीसाठी एक तज्ज्ञांची टीम पाठवली आहे. करोनाचं संकट पाहता शाळा बंद करण्यात आल्या आहेत. १३ सप्टेंबरला ५९ रुग्णांना करोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर प्रशासन ख़डबडून जागं झालं आहे. एका दिवसापूर्वी म्हणजेत १२ सप्टेंबर ही संख्या २२ इतकी होती. रुग्णसंख्या दुप्पटीने वाढल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे योग्य वेळी पावलं उचलली नाहीत तर करोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सहकाऱ्यांना करोनाची लागण झाल्यानंतर रशियाचे राष्ट्रपती पुतिन आयसोलेट

अवघ्या चार दिवसात ५ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या फुजियान भागात १०२ रुग्ण आढळले आहेत. १ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय सुट्ट्या सुरु होत आहेत. पर्यटनासाठी पर्यटक फुजियानला मोठ्या संख्येने येतात. मात्र करोना रुग्णांची संख्या पाहता यावर प्रशासनाने निर्बंध आणले आहेत. त्याचा पर्यटन आणि वाहतूक क्षेत्राला फटका बसला आहे. १२ सप्टेंबरपर्यंत चीनमध्ये एकूण ९५ हजार २४८ करोना रुग्ण आढळले. तर ४ हजार ६३६ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाचा उद्रेक शेवटचा चीनच्या जियांगसू भागात झाला होता. दोन आठवड्यापूर्वी तिथली स्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र आता पुतियानमध्ये आढळून आलेल्या रुग्णांमध्ये डेल्टा रुग्ण अधिक असल्याचं समोर आल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.