कोविड-१९ विरुद्ध सुरू असलेला लढा अधिक तीव्र करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युद्धकालीन राष्ट्रीय रणनीती जारी केली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला करोना चाचणी आणि त्यानंतरचे विलगीकरण बंधनकारक केले आहे.
करोनाचे निर्मूलन करण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागणार आहे, परंतु या प्रश्नावर जनता एकत्र आली तर आपण या आपत्तीवर निश्चितच मात करू, असे बायडेन म्हणाले. बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ही बाब स्पष्ट केली आहे.
प्रत्येकाने मुखपट्टीचा वापर करण्याबरोबरच दुसऱ्या देशातून अमेरिकेत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने विमानात बसण्यापूर्वी करोना चाचणी करून घेणे गरजेचे आहे आणि अमेरिकेत आल्यानंतर विलगीकरणात जाणे आवश्यक आहे, असे बायडेन यांनी व्हाइट हाऊसमध्ये याबाबतच्या आदेशावर स्वाक्षरी करताना सांगितले. अमेरिकेला करोनाचा सर्वाधिक फटका बसला असून तेथे चार लाखांहून अधिक जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे, तर देशातील २४.५ दशलक्ष लोक करोनाने बाधित आहेत, असे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांशी हॅरिस यांची चर्चा
अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडॉस अधनोम घेब्रेसस यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून अमेरिका पुन्हा संघटनेत सामील होत असल्याची माहिती दिली. बायडेन प्रशासनाने सत्ताग्रहण केल्यानंतर माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले परराष्ट्र धोरण विषयक अनेक निर्णय बदलले असून जागतिक आरोग्य संघटनेत पुन्हा सामील होण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रम्प यांनी करोना साथीच्या वेळी जागतिक आरोग्य संघटनेने चीनला पाठीशी घातल्याचा आरोप करीत अकार्यक्षमतेच्या मुद्दय़ावर आरोग्य संघटनेतून माघार घेतली होती. हॅरिस यांनी सांगितले, की बायडेन यांचा जागतिक आरोग्य संघटना कोविड १९ साथ नियंत्रणात आणू शकते यावर विश्वास आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 23, 2021 12:24 am