करोनाची साथ व त्यानंतर लावण्यात आलेले निर्बंध यामुळे जगातील अनेक देश व खंडातील १.६ अब्ज विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे. करोनाच्या आर्थिक फटक्यामुळे पुढील वर्षी २३.८ दशलक्ष विद्यार्थी शिक्षणच घेऊ शकणार नाहीत असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांनी म्हटले आहे की, शिक्षण हा व्यक्तिगत विकासाचा पाया असून समाजाच्या भवितव्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. त्यातून अनेक संधी निर्माण होऊन असमानता कमी होत जाते. सहिष्णू, ज्ञानाधिष्ठित समाज हे शाश्वत विकासाचे प्रमुख घटक आहेत. जुलैच्या मध्यावधीत १६० देशात  शाळा बंद असून त्याचा फटका १ अब्ज मुलांना बसला आहे. ४ कोटी मुलांचे शिक्षण पूर्व प्राथमिक पातळीवरच थांबले आहे. करोना व त्यानंतरचे निर्बंध, त्यातून झालेले आर्थिक नुकसान, शाळा बंद ठेवण्याची आलेली वेळ यातून २३.८ दशलक्ष विद्यार्थी शिक्षणातून गळाले आहेत.

मुले व महिला तसेच इतरांनाही घरात रहावे लागत असून पालक व शिक्षक यांच्यावर ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याची वेळ आली पण अनेक मुलांकडे मोबाइल व लॅपटॉप नसल्याने त्यांना ऑनलाइन शिक्षणात सहभागी होता येत नाही. करोना आधीच्या काळातही शाळेच्या वयातील २५ कोटी मुले शाळेबाहेर होती. मध्य उत्पन्न गटात शिक्षण निधीत १.५ लाख कोटींची कमतरता आहे.