चेन्नई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) १०० हून अधिक जणांना करोनाची लागण झाली असून त्यात बहुतांश विद्यार्थी आहेत.

करोनाच्या वाढत्या प्रसारामुळे संस्था तूर्त बंद करण्यात आल्याचे वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. एकूण १०४ विद्यार्थ्यांना करोना संसर्ग झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर या सर्वाची प्रकृती सुधारत आहे, असे तमिळनाडूचे आरोग्य सचिव जे.राधाकृष्णन यांनी सांगितले.

आतापर्यंत ४४४ जणांचे नमुने घेण्यात आले असून १०४ जण करोना बाधित निघाले आहेत. १ ते १२ डिसेंबर दरम्यान संस्थेतील अनेकांचे नमुने घेण्यात आले, त्यानंतर सुरुवातीला रुग्णांची संख्या ३३ होती ती आता १०४ झाली आहे. या सर्वावर किंग्ज इन्स्टिटय़ूट ऑफ प्रिव्हेन्टिव्ह मेडिसीन अँड रिसर्च या संस्थेत उपचार चालू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.

मुख्यमंत्री के.पलानीस्वामी यांच्या आदेशानुसार या सर्वाना किंग्ज इन्स्टिटय़ूट येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. भारतीय तंत्रज्ञान संस्थेने म्हटले आहे, की सर्व विभाग व प्रयोगशाळा बंद करण्यात आल्या असून एकूण ७०० संशोधक विद्यार्थ्यांनाच नऊ वसतिगृहात राहण्याची अनुमती दिली आहे. विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाइन सुरू आहेत.

राधाकृष्णन यांनी सांगितले, की एकूण रुग्णांच्या चाचण्या सकारात्मकतेचा दर २० टक्के असला तरी काळजी करण्याचे कारण नाही, कारण या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू असून सर्व नियमांचे पालन करण्यात येत आहे.