लंडन : येथे ‘जी ७’ देशांच्या शिखर परिषदेसाठी भारताच्या वतीने परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या नेतृत्वाखाली दाखल झालेल्या शिष्टमंडळात दोघांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याने आता उर्वरित कार्यक्रमाची फेरआखणी करण्यात येत असून थेट भेटीचे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत.

जयशंकर यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, काल सायंकाळी आमच्या शिष्टमंडळातील दोन जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी दक्षतेचा भाग म्हणून आपण पुढील सर्व कार्यक्रम आभासी पद्धतीने पार पाडणार आहोत. ‘जी ७’ देशांची बैठकही याच पद्धतीने आपण पार पाडू. डॉ. जयशंकर हे ‘जी ७’ बैठकीला उपस्थित राहणार नाहीत ते आभासी पद्धतीने या बैठकीला संबोधित करतील, असे कोविड सोपस्कारानुसार आता ठरवण्यात आले आहे. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमनिक राब यांच्यासमवेत गुरुवारी जयशंकर यांची केंट येथे चर्चा होणार होती पण आता ती आभासी पातळीवर होणार आहे. जयशंकर हे सोमवारी लंडनमध्ये आले असून त्यांना डॉमनिक राब यांनी निमंत्रण दिले होते. भारतीय शिष्टमंडळ अजून लंडनमधील लँकेस्टर येथील ‘जी ७’ बैठकीसाठी गेलेले नाही.  राब यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलिया, भारत, कोरिया, दक्षिण आफ्रि केतील आमचे मित्र तसेच आग्नेय आशियातील देश यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती पाहता हिंद प्रशांत क्षेत्राला ‘जी ७’ बैठकीत महत्त्व आहे.