सलग दुसऱ्या दिवशी देशात करोना रुग्णसंख्या ४० हजारांपेक्षा कमी नोंदवण्यात आली आहे. आज (शनिवार) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत करोनाचे ३९ हजार ०९७ नवीन रुग्ण आढळले. तर ५४६ करोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल (शुक्रवार) ३५,३४२ रुग्णांची नोंद झाली होती. त्याचबरोबर, गेल्या २४ तासांत ३५ हजार ०८७ जणांनी करोनावर मात केली आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार केला. दरम्यान काहीसं दिलासादायक वातावरण देशात आहे. सध्या देशात ४ लाख ०८ हजार ९७७ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यांत देशात ३ कोटी १३ लाख ३२ हजार १५९ रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३ कोटी ०५ लाख ०३ हजार १५९ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर ४ लाख २० हजार ०१६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात २४ तासांत १६७ करोनाबळी

गेल्या २४ तासांच्या राज्यातील आकडेवारीचा विचार करता नव्या करोनाबाधितांचा आकडा जरी अजूनही नियंत्रणात असला, तरी मृतांचा आकडा मात्र कमी होण्याचं नाव घेत नाहीय. आज दिवसभरात राज्यात तब्बल १६७ करोना मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर आता थेट २.०९ टक्के इतका झाला आहे. आजच्या मृतांच्या आकडेवारीमुळे राज्यात आत्तापर्यंत करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ३१ हजार २०५ च्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे नवे करोनाबाधित जरी कमी असले, तरी मृतांचा आकडा ही राज्य सरकार आणि आरोग्य प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरली आहे.

राज्यात नव्याने नोंद झालेल्या करोनाबाधितांची संख्या ६ हजार ७५३ इतकी आहे. गुरुवारपेक्षा हा आकडा जरी कमी असला, तरी त्याच तुलनेत बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा देखील कमी झाला आहे. गुरुवारी ७ हजार ३०२ नवे करोनाबाधित सापडले होते. मात्र, त्यासोबतच ७ हजार ७५६ रुग्ण बरे देखील झाले होते. मात्र, आज ही संख्या कमी होऊन ५ हजार ९७९ इतकी झाली आहे. राज्यात आजपर्यंत सापडलेल्या करोनाबाधितांचा आकडा आता ६२ लाख ५१ हजार ८१० इतका झाला आहे तर आजपर्यंत ६० लाख २२ हजार ४८५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.