करोना लसीकरण मोहीम देशात सुरू झाल्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी देशातील करोना रुग्णांची संख्या मात्र कमी होण्याचं नाव घेत नाहीये. किंबहुना त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. गेल्या २४ तासांत तर देशात दीड महिन्यातली सर्वाधिक वाढ झाल्याची नोंद केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात तब्बल १७ हजार ४०७ नवे करोनाबाधित सापडले असून ८९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातल्या एकूण करोनाबाधितांचा आकडा १ कोटी ११ लाख ५६ हजार ९२३ इतका झाला असून आत्तापर्यंत करोनामुळे १ लाख ५७ हजार ४३५ रुग्ण दगावले आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये सापडलेल्या नव्या करोनाबाधितांपैकी ८५.५१ टक्के बाधित फक्त ६ राज्यांमध्ये सापडले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक बाधित आहेत.

 

ताज्या आकडेवारीनुसार…

देशात सापडलेल्या नव्या १७ हजार ४०७ करोनाबाधितांपैकी ८५.५१ टक्के बाधित हे महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तमिळनाडू, गुजरात आणि कर्नाटक या ६ राज्यांमध्ये सापडले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ९ हजार ८५५ करोना बाधित सापडले आहेत. त्यामुळे या सर्व राज्यांमध्ये करोनासंदर्भातले निर्बंध पुन्हा लागू करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने किंवा काही प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, एकीकडे करोनाबाधितांची संख्या हळूहळू वाढू लागली असली, तरी यातून बऱ्या झालेल्या नागरिकांचा आकडा देखील दिलासादायक आहे. आत्तापर्यंत सापडलेल्या एकूण बाधितांपैकी १ कोटी ८ लाख २६ हजार ७५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजघडीला देशात १ लाख ७३ हजार ४१३ इतकेच अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत देशात १ कोटी ६६ लाख १६ हजार ४८ नागरिकांना करोनाची लस देण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

 

या राज्यांमध्ये २४ तासांत एकही मृत्यू नाही!

दरम्यान, काही राज्यांमध्ये मृत्यूदर कमी होत नसला, तरी काही राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मात्र दिलासादायक चित्र आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, जम्मू-काश्मीर, ओडिसा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, गोवा, उत्तराखंड, झारखंड, पुद्दुचेरी, आसाम, लक्षद्वीप, नागालँड, सिक्किम, लडाख, त्रिपुरा, अंदमान-निकोबार बेटे, मणिपूर, मिझोराम, मेघालय, दादरा-नगर हवेली आणि अरुणाचल प्रदेश यांचा यात समावेश आहे.