25 February 2021

News Flash

“करोनाविरुद्धच्या लढाईत भारत जागतिक स्तरावर नेतृत्व करतोय”; मोदी सरकारच्या मदतीची UN कडून दखल

आतापर्यंत भारताने ५० हून अधिक देशांना केलीय मदत

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य: रॉयटर्स आणि ट्विटरवरुन साभार)

संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच इतर देशांना करोना लसींचे लाखो डोस पुरवणाऱ्या भारताचे संयुक्त राष्ट्रांनी कौतुक केलं आहे. भारताने संयुक्त राष्ट्रांच्या शांतीदुतांसाठी लसपुरवठा करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. संयुक्त राष्ट्राने भारताच्या या निर्णयाचं स्वागत केलं असून करोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये भारत हा जागतिक स्तरावर नेतृत्व करत असल्याचं सांगत भारताला ग्लोबल लीडर असं म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार संयुक्त राष्ट्रामधील भारताच्या सचीव असणाऱ्या टी. एस. तिरुमूर्ती यांनी केला आहे. “करोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये भारत ग्लोबल लीडर म्हणून काम करत आहे. कोवॅक्स सेवेला बळकटी देण्यासाठी भारत जगभरातील वेगवेगळ्या देशांना लसीचा पुरवठा करत आहे. जगभरात लसी पुरवणाऱ्या भारताचे आम्ही आभार मानतो,” असं संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे. केंद्रातील मोदी सरकारने करोना लसींसंदर्भात जागतिक स्तरावर मदत करण्यासाठी आम्ही कायमच तयार असल्याचे आधीच स्पष्ट केलं आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आतापर्यंत भारताने ५० हून अधिक देशांना करोना लसींचा पुरवठा केलाय. त्यामुळेच संयुक्त राष्ट्राने मोदी सरकारच्या या प्रयत्नांची दखल घेत भारताला ‘ग्लोबल लीडर इन वॉर अगेन्सट करोना’ असल्याचे म्हणत शब्बासकी दिलीय.

नक्की वाचा >> संयुक्त राष्ट्र म्हणते, “जगातील १३० हून अधिक देशांना करोनाची एकही लस मिळालेली नाही तर दुसरीकडे…”

गुट्रेस यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचेही आभार मानले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारताने मागील आठवड्यापर्यंत एकूण २२९.७ लाख लसी निर्यात केल्या आहेत. भारतामध्ये १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात केलीय. पहिल्या दिवशीच भारतामध्ये २० लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. इतकचं नाही तर भारताने संयुक्त राष्ट्रांसाठी काम करणाऱ्या हजारो व्यक्तींचेही लसीकरण केलं आहे. केंद्र सरकारकडून करोना लसीकरणासंदर्भातील कोविन नावचे अ‍ॅप्लिकेशनही लॉन्च करण्यात आलं आहे. लसीकरणासंदर्भातील संपूर्ण माहिती आणि त्याबद्दलचे आकडेवारी जमा करण्याच्या हेतूने हे अ‍ॅप लॉन्च करण्यात आलं आहे.

भारताने सध्या कोव्हॅक्सीन आणि कोविशिल्ड या दोन लसींच्या वापराला परवानगी दिली आहे. आठवड्याची आकडेवारी देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी भारताने ओणान, निकारागुआसोबतच अनेक देशांमध्ये लवकरच करोना लसीचा पुरवठा करणार असल्याचे सांगितले. भारत लवकरच आफ्रीकेमधील देशांसाठी एक कोटी डोस पाठवणार आहे. त्याचप्रमाणे १० लाख डोस केवळ संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पाठवण्यात येतील असंही भारताने स्पष्ट केलं आहे. तातडीने आपल्या नागरिकांना करोना लस देणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. त्यामुळे देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर भारत करोना लसीकरणाच्या बाबातील खरोखरच नेतृत्व करत असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 9:46 am

Web Title: corona vaccination india is global leader says united nations scsg 91
टॅग Coronavirus
Next Stories
1 कमलनाथ यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी भरलेली लिफ्ट १० फूट खाली कोसळली अन्….
2 “उत्तर ठाऊक नसेल तर उत्तराऐवजी प्रश्नच लिहून या”; शिक्षण विभागाच्या संचालकांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला
3 संयुक्त राष्ट्र म्हणते, “जगातील १३० हून अधिक देशांना करोनाची एकही लस मिळालेली नाही तर दुसरीकडे…”
Just Now!
X