पुढील महिन्यात करोना लसीकरणाला आरंभ?

नवी दिल्ली : अ‍ॅस्ट्राझेन्का कंपनीने तयार केलेल्या कोविड १९ प्रतिबंधक ऑक्सफर्ड लशीच्या १० कोटी कुप्या पुढील महिन्यात भारतात उपलब्ध होणार आहेत. त्याच महिन्यात भारतात कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लशीची निर्मिती अ‍ॅस्ट्राझेन्का करीत असून अंतिम टप्प्यातील चाचण्यांचे निकाल समाधानकारक   येण्याची अपेक्षा आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने यात १ अब्ज डोसच्या निर्मितीसाठी भागीदारी केली असून या कंपनीला डिसेंबपर्यंत लस निर्मितीचा परवाना मिळण्याची शक्यता आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितले.

पूनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, लस निर्मितीतील पहिल्या कुप्या  या भारतातच वापरल्या जातील. पुढील वर्षी पूर्ण परवाना मिळाल्यानंतर ५०-५० प्रमाणात दक्षिण आशियायी देशांत लशीचे वितरण केले जाईल. गरीब देशांसाठी लस खरेदीचे काम जागतिक आरोग्य संघटनेची संस्था करणार असून सीरमने पाच विकसकांशी करार केला आहे. आतापर्यंत अ‍ॅस्ट्राझेन्का लशीचे ४ कोटी डोस दोन महिन्यांत उत्पादित करण्यात आले आहेत. नोव्हाव्हॅक्स इनकार्पोरेशनही लस निर्मितीच्या  शर्यतीत आहे.

अ‍ॅस्ट्राझेन्काचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सोरियॉट यांनी म्हटले आहे, की डिसेंबरमध्ये ब्रिटनने आपत्कालीन परवाना दिल्यानंतर लशीचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन केले जाईल.

अ‍ॅस्ट्राझेन्का व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या लशीच्या चाचण्यांचे अंतिम निष्कर्ष बाकी आहेत.

फायझर इन्कार्पोरेशनने लस तयार केली असली आणि ती ९० टक्के प्रभावी असली, तरी  ही लस  उणे ७० अंश तपमानाला ठेवावी लागते. जगातील अनेक भागांत अशा प्रकारची पायाभूत व्यवस्था असणे कठीण आहे.  अ‍ॅस्ट्राझेन्काची लस ही फायझरपेक्षा सोयीची आहे, कारण ती प्रशीतकाच्या तपमानाला  (म्हणजे फ्रीजमध्ये) ठेवता येण्यासारखी आहे, असे  पूनावाला यांनी सांगितले.

‘२०२४ पर्यंत जगभरात लसीकरण पूर्ण’

पूनावाला यांनी सांगितले, की २०२४ पर्यंत सगळ्या जगात लशीकरण पूर्ण होऊ शकते. करोना संसर्गाचे प्रमाण कमी होण्यास किमान दोन वर्षे तरी लागतील. कारण लस परवडणारी असायला हवी शिवाय उत्पादनातील अडथळेही दूर व्हायला हवेत. सरकारशी चर्चेनंतर जोखमीच्या व्यक्ती व इतरांना प्रामुख्याने लस उपलब्ध करून देता येईल. भारतातील १.३ अब्ज लोकांना लस देणे हे मोठे आव्हान आहे. कारण यापूर्वी इतर रोगांच्या लसीकरणात अनेक अडचणी आल्या होत्या