देशात कोविड १९ प्रतिबंधक लस घेणे  नागरिकांसाठी ऐच्छिक राहील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. भारतात विकसित करण्यात आलेल्या लशी इतर देशांतील लशीइतक्याच परिणामकारक आहेत असेही स्पष्ट करण्यात आले.

मंत्रालयाने पुढे म्हटले आहे, की कोविड १९ प्रतिबंधक लस घेणे हे हितकारक आहे. जरी आधी कोविड १९ चा संसर्ग होऊन गेला असेल तरी ठरावीक मुदतीत या लशीच्या दोन मात्रा घेणे लोकांच्या हिताचे राहील.  मंत्रालयाने कोविड १९ संदर्भात नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे दिली असून त्यात म्हटले आहे, की कोविड १९ लशीची कुणावर सक्ती केली जाणार नाही. पण लस घेतलेले केव्हाही चांगले असेल. ती अर्धवट मात्रेत घेऊ नये तर पूर्ण दोन मात्रा घेतल्या जाव्यात. त्यामुळे त्या व्यक्तीचे करोनापासून संरक्षण होईल व इतरांनाही त्याची बाधा होणार नाही. कुटुंबीय, मित्र, नातेवाईक, सहकर्मचारी यांना संरक्षण मिळेल. देशातील लशीच्या चाचण्या वेगवेगळ्या पातळ्यांवर असून भारतातील पहिली लस लवकरच जारी करण्यात येईल. सहा लशी भारतात तयार होत असून त्यात आयसीएमआर व भारत बायोटेक यांची कोव्हॅक्सिन, झायडस कॅडिलाची झायकोव्ह डी, जिनोव्हाची एमआरएनए लस, सीरमची कोविशिल्ड, हैदराबादची डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज तयार करीत असलेली रशियाची स्पुटनिक ५ या लशींचा समावेश आहे. सहावी लस हैदराबादमधील बायोलॉजिकल इ. लि. ही कंपनी तयार करीत असून ती अमेरिकेतील एमआयटी या संस्थेच्या सहकार्याने विकसित केली जात आहे.

‘कोविड रुग्णालयांचे आग सुरक्षा प्रमाणन करावे’

राज्यांनी कोविड १९ साठी राखीव रुग्णालयांची आग प्रतिबंधक पाहणी करून प्रमाणपत्र घ्यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.   पाहणी करून चार आठवडय़ात अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सुरक्षितता आणि परिणामकारकता

भारतात उपलब्ध होणारी लस सुरक्षित असेल का, कारण या लशी कमी काळात तयार करण्यात आल्या आहेत, या प्रश्नावर मंत्रालयाने म्हटले आहे, की नियामक संस्थांच्या परवानगीनंतरच या लशी जारी करण्यात येतील. त्याची सुरक्षितता व परिणामकारकता तपासली जाईल. कोविड १९ लस सर्व सुरक्षा निकषांची पूर्तता झाल्यानंतर आणली जाईल. कुठल्याही लशीमुळे  कमी प्रमाणातील ताप, वेदना यासारखे काही परिणाम दिसू शकतात. राज्यांनी लशीच्या परिणामांमुळे दिसणाऱ्या लक्षणांवर उपचारासाठीही सज्जता ठेवली आहे. त्याचबरोबर लस वितरणाची तयारीही केली आहे. दोन मात्रा २८ दिवसांत दिल्यानंतरच कुठल्याही व्यक्तीची लसीकरण प्रक्रिया  पूर्ण होईल. कर्करोग, मधुमेह, अतिरक्तदाब यावर औषधे घेत असलेल्या व्यक्तींनाही लस घेता येईल. या सह-आजारांमुळे कोविडचा परिणाम आणखी घातक होत आहे, त्यामुळे वरील आजारांच्या व्यक्ती लस घेऊ शकतात.

पन्नाशीवरील व्यक्तींना लस आधी उपलब्ध करून दिली जाईल, त्याही आधी ती आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाईल. संबंधितांना त्यांच्या मोबाइलवर लसीकरणाचे जवळचे ठिकाण व वेळ कळवण्यात येईल. लशीच्या दोन मात्रा घेणाऱ्यांना क्यूआर कोड प्रमाणपत्र जारी केले जाईल, ते त्यांच्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात येणार आहे. लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रावर अर्धा तास विश्रांतीसाठी थांबणे गरजेचे आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

अमेरिकेत मॉडर्ना लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्याचीही तज्ज्ञांची शिफारस

वॉशिंग्टन : मॉडर्ना कंपनीच्या कोविड १९ प्रतिबंधक लशीला आपत्कालीन परवाना देण्याची शिफारस तज्ज्ञ समितीने अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाला केली आहे. याआधी फायझरच्या एमआरएनए लशीला अमेरिकेत आपत्कालीन वापराचा परवाना देण्यात आला असून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आता मॉडर्नाच्या लशीलाही मान्यता मिळण्याच्या दिशने एक पाऊल पुढे पडले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या जैव उत्पादने सल्लागार समितीने या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी शिफारस केली आहे. गुरुवारी २० विरुद्ध ० मतांनी ही शिफारस करण्यात आली असून एक जण तटस्थ राहिला.