सोनिया गांधी यांचे काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन

नवी दिल्ली : करोना लसीकरणाचा वेग वाढवा, लशी वाया घालवू नका, लसीकरणाबाबत लोकांच्या मनातील संभ्रम दूर करा अशा सूचना काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुरुवारी झालेल्या महासचिव व राज्य प्रभारींच्या बैठकीत दिल्या. काही महिन्यांमध्ये करोनाची तिसरी लाट येण्याची भीती असून लहान मुलांना फटका बसू नये यासाठी काँग्रेस सरकारांनी जय्यत तयारी करावी, असेही आवाहन सोनिया गांधी यांनी केले.

करोना आपत्तीच्या हाताळणीवरून काँग्रेसने केंद्र सरकारला सातत्याने लक्ष्य बनवले आहे. दोन दिवसांपूर्वी करोनावरील श्वेतपत्रिकाही प्रकाशित करण्यात आली. पहिल्या व दुसऱ्या करोना लाटेतील केंद्राच्या गैरव्यवस्थापनावर टीकाही केली होती. त्यावर, काँग्रेसने सत्ता असलेल्या राज्यांमधील करोनाची वस्तुस्थिती तपासून पाहावी असे प्रत्युत्तर भाजपने दिले होते. या पार्श्वभूमीवर, सोनिया गांधी यांनी महासचिवांची बैठक घेतली असून लसीकरणाच्या प्रक्रियेत काँग्रेसने अधिक सक्रिय होण्याचा सल्लाही दिला.

लोकांमध्ये अजूनही लसीकरणाबाबत शंका असून त्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दूर केल्या पाहिजेत. लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असून आपापल्या भागांमध्ये अधिकाधिक लोकांचे लसीकरण केले जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे. लसीकरणाचा वेग किमान तिपटीने वाढवला पाहिजे, अशी सूचनाही सोनिया गांधी यांनी दूरचित्रसंवादाद्वारे झालेल्या बैठकीत केली. वर्षा अखेरपर्यंत देशातील ७५ टक्के लोकांचे लसीकरण होणे गरजेचे असून त्यादृष्टीने काँग्रेस पक्षाने सकारात्मक प्रयत्न करावेत. लशींच्या उपलब्धतेवर लसीकरण अवलंबून असले तरी काँग्रेसने केंद्र सरकारवर लसीकरणासाठी दबाव टाकला पाहिजे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. २१ जूनपासून केंद्र सरकारने मोफत लसीकरणाची मोहीम सुरू केली असून पहिल्याच दिवशी ८८ लाख लसमात्रा दिल्या गेल्या होत्या, मात्र दुसऱ्या दिवशी लसीकरणाचा वेग मंदावला. करोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रामुख्याने युवक काँग्रेसच्या नेत्यांनी लोकांना केलेल्या मदतीचे सोनियांनी कौतुक केले. महागाई व बेरोजगारीच्या मुद्द्यांवर त्यांनी केंद्रावर टीका केली.