नवी दिल्ली: कोविड-१९ लसीकरण मोहिमेसाठी जी यंत्रणा उभारण्यात आली आहे त्याच्या सुसज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारने २८ आणि २९ डिसेंबर रोजी पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये सराव फेऱ्यांचे आयोजन केले आहे.

लशीच्या वितरणावर देखरेख ठेवण्यासाठीचा ऑनलाइन मंच को-विनमध्ये आवश्यक ती नोंदणी करणे, चाचणीपत्र आणि त्याचे वितरण, पथकातील सदस्य तैनात करणे, सायंकाळच्या बैठका आणि अहवाल यांचा सराव फेऱ्यांमध्ये अंतर्भाव करण्यात येणार आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. त्याचप्रमाणे कोविड-१९ लशी ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या शीतकरण व्यवस्थेची चाचणी, चाचणीसाठी येणाऱ्या गर्दीचे शारीरिक अंतर ठेवून व्यवस्थापन करणे यांचाही सराव फेऱ्यांमध्ये समावेश करण्यात येणार आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. प्रत्येक राज्याने दोन जिल्ह्य़ांत अशा फेऱ्या आयोजित करावयाच्या आहेत. जिल्हा रुग्णालये,  प्राथमिक आरोग्य केंद्रे,  ग्रामीण भाग येथे मुख्यत्वे फेऱ्यांचे आयोजन अपेक्षित आहे.

कर्नाटकमध्ये रात्रीच्या संचारबंदीवरून वाद 

बंगळूरु: करोना नियंत्रणासाठी  रात्रीची संचारबंदी लागू करण्याची कल्पना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांची होती, मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची नव्हे, असा दावा कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी शुक्रवारी येथे केला.शिवकुमार आणि सुधाकर यांच्यात गुरुवारी शाब्दिक चकमक उडाली होती, भाजप सरकारच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी रात्रीची संचारबंदी जारी करण्याची टूम काढून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे शिवकुमार म्हणाले.